होरमुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद
लोकवाहिनी न्यूज
तेहरान : ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. इराण-अमेरिका करार धोक्यात आला आहे. इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने, संघर्ष संपवण्यासाठीच्या सामंजस्य कराराचे अमेरिकेने केलेले उल्लंघन, दक्षिण लेबनॉनमधून सैन्य मागे घेण्यास आलेले अपयश आणि इस्रायलकडून शस्त्रसंधीचे सतत होणारे उल्लंघन, ही कारणे देत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी जलवाहतूक बंद करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे आता जगभरात पुन्हा खळबळ उडाली आहे.
अमेरिका आणि इराण युद्धावर अखेर तीन महिन्यांच्या कालावधीनंतर तोडगा काढण्यात यश आले आहे. युद्ध समाप्तीच्या करारावर दोन्ही देशांकडून नुकतंच शिक्कामोर्तब करण्यात आलं. अमेरिका आणि इराणमधील युद्ध संपवण्यासाठी ऐतिहासिक शांतता करारावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेशक्यान यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्ध अधिकृतरीत्या संपल्याचं मानलं जात आहे.
दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी करार झाल्याची बातमी आल्यानंतर काही तासांतच, शनिवारी दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यात दोन मुलांसह किमान सात जण ठार झाले. अमेरिका-इराण शांतता करारात लेबनॉनचा देखील समावेश आहे. मात्र, असं असतानाही इस्रायलकडून कराराचं उल्लंघन करत लेबनॉनवर हल्ला केल्यामुळे इराणने संतप्त होत मोठा निर्णय घेतला आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.










