भाजप- 8, काँग्रेस- 2 आणि एआयएमआयएमकडून 1 अर्ज दाखल
नागपूर, ता. १६: नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती (झोन) सभापतीपदासाठी एकूण 11 जणांनी उमेदवारी अर्ज गुरुवारी (ता.16) मनपाच्या मुख्यालयात दाखल केले. शहरात असलेल्या एकूण दहा झोन सभापतीपदासाठी एकूण 11 अर्ज दाखल झाले असून यात भाजपकडून 8, काँग्रेसकडून 2 आणि एआयएमआयएम कडून 1 उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती (झोन) सभापतीसाठी निवडणूक शुक्रवारी (ता.17) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात सकाळी 11 वाजता होणार आहे. या प्रसंगी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी श्री. कुमार आशीर्वाद उपस्थित राहणार आहेत.
नागपूर महानगरपालिकेच्या निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांच्याकडे डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समितीच्या सभागृहात भाजप, काँग्रेस आणि एमआयएमच्या उमेदवारांनी प्रभाग समिती (झोन) सभापतीसाठी गुरुवारी अर्ज दाखल केले. याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी श्री.मनीष सोनी, राजस्व निरीक्षक श्री. विलास धुर्वे, श्री. भूषण शेलार, श्री. मृणाल बागडे, श्री. अनिल दवडे यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
भाजपकडून प्रभाग समिती (झोन) सभापतीसाठी नामनिर्देशन पत्र स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्या उपस्थितीत आठही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यात नगरसेविका श्रीमती तारा(लक्ष्मी) यादव (लक्ष्मीनगर झोन), नगरसेविका श्रीमती धनश्री देशपांडे (धरमपेठ झोन), नगरसेविका श्रीमती ज्योती देवघरे (हनुमाननगर झोन), नगरसेविका श्रीमती भारती बुंदे (धंतोली झोन), नगरसेविका श्रीमती सीमा ढोमणे (नेहरूनगर झोन), नगरसेविका श्रीमती उमा देशमुख (गांधीबाग झोन), नगरसेविका श्रीमती अभिरुची राजगिरे (सतरंजीपुरा झोन), नगरसेविका श्रीमती महेश्वरी बिसेन (लकडगंज झोन) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी आरोग्य विशेष समितीच्या सभापती श्रीमती मनीषा अतकरे, नगरसेवक श्री. पिंटू झलके, नगरसेवक श्री. श्रीकांत आगलावे, जलप्रदाय विशेष समितीच्या सभापती श्रीमती दिव्या धुरडे, नगरसेवक श्री. प्रदीप पोहाणे, नगरसेवक श्री. रामभाऊ अंबुलकर उपस्थित होते.
तर काँग्रेसकडून विरोधी पक्ष नेता श्री. संजय महाकाळकर यांच्या उपस्थितीत आशीनगर झोन करिता श्री. आसिफ शेख यांनी तर मंगळवारी झोनकरिता नगरसेविका श्रीमती सीमा डवरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी नगरसेवक श्रीमती सुजाता कोंबाडे, नगरसेविका श्रीमती भावना लोणारे, नगरसेवक श्री. विवेक निकोसे, नगरसेवक श्री. अभिजीत प्रभूकांत झा, नगरसेवक शैलेश रामसुंदर पांडे, नगरसेवक श्री. गौतम अंबादे, नगरसेवक श्री. अभिषेक शंभरकर उपस्थित होते. एआयएमआयएमकडून प्रभाग समिती (झोन) सभापतीपदासाठी आशीनगर झोनकरिता श्रीमती अलिशा फहीम खान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापतीसाठी भाजपकडून अर्ज दाखल
विद्युत व अग्निशमन समिती सभापतीसाठी नामनिर्देशन पत्र स्थायी समिती सभापती श्रीमती शिवाणी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्या उपस्थितीत श्रीमती रुपाली ठाकूर, तर उपभापतीसाठी श्री लखन येरवार यांनी अर्ज दाखल केला.








