लोकवाहिनी न्यूज:वर्धा : वर्धेकरांच्या ३१ मे ही तारीख कायम लक्षात राहील. कारण याच दिवशी अन्न व औषधी प्रशासनाच्या नागपूर कार्यालयाने येथील सुप्रसिद्ध गोरस भंडारवर धाड टाकून दूध, दही, तूप व अन्य पदार्थाचे नमुने ताब्यात घेत पुढील आदेशापर्यंत कारभार बंद ठेवण्याचे निर्देश दिले. विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी या कारवाईचे समर्थन करीत नागरिकांना शुद्ध अन्न मिळणे हा त्यांचा अधिकार असून भेसळ केल्यास कठोर कारवाई करू, असा लेखी इशारा या अनुषंगाने दिला होता. पण या कारवाई विरोधात संतप्त पडसाद उमटले. या कारवाई विरोधात आज गोरस भंडारच्या मुख्यालयातून मूक मोर्चा काढण्यात आला. त्यात नगराध्यक्ष सुधीर पांगुळ तसेच विविध गांधीवादी संस्थांचे प्रतिनिधी, शेतकरी व जवळ पोहचलेले नागरिक सहभागी झाले.
गोरस भंडार वाचवा, वर्धेची ओळख वाचवा, गोरस भंडार नाही, विरासत आहे असे व अन्य फलक झळकले. मूक मोर्चा शांततेत झाल्यानंतर जिल्हाधिकारी वानमथी सी. यांना निवेदन देण्यात आले. गोरस भंडार ही वर्ध्याच्या सहकार चळवळीतील एक ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित संस्था असून, १९३८ पासून शेतकरी, उत्पादक, कर्मचारी, वितरक आणि ग्राहक यांना जोडणारी एक महत्त्वाची लोकाभिमुख व्यवस्था म्हणून कार्यरत आहे. गोरस पाकसह विविध उत्पादने वर्ध्याची ओळख देशभर पोहोचवत आहेत.
अशा महत्त्वपूर्ण संस्थेवर कोणतीही पूर्वसूचना, संवाद किंवा सुधारणा करण्याची पुरेशी संधी न देता करण्यात आलेली एकतर्फी प्रशासकीय कारवाई अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. प्रशासनाचे कर्तव्य संस्था बंद करणे नसून, त्रुटी दूर करून त्या अधिक सक्षमपणे कार्यरत राहतील यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करणे हे आहे. लोकांच्या विश्वासावर उभी असलेली आणि जवळपास शतकाभराची परंपरा जपणारी ही संस्था बंद होणे हे वर्ध्याच्या सामाजिक व आर्थिक हितासाठी घातक ठरेल. त्यामुळे या प्रकरणी तत्काळ सकारात्मक व न्याय निर्णय घेणे आवश्यक आहे. आम्ही आपणास विनंती करतो की गोरस भंडारचे कार्य पूर्ववत सुरू करण्याचे आदेश निर्गमित करण्यात यावेत, अशी माहिती निमंत्रक अविनाश काकडे यांनी दिली.










