लोकवाहिनी न्यूज,वर्धा: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधींचे अनेक वर्षे वास्तव्य असलेल्या सेवाग्राम आश्रमास भेट दिली. या भेटीत त्यांनी प्रार्थना सभेत सहभाग घेतला आणि परिसरात वृक्षारोपणही केले.
यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर उपस्थित होते. आश्रमात आगमन झाल्यानंतर आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने सचिव विजय तांबे व विश्वस्त चंदनपाल यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रपतींनी बापूंचे पहिले निवासस्थान असलेल्या आणि आता ‘आदि निवास’ म्हणून ओळखल्या जात असलेल्या बापू कुटीची पाहणी केली.
राष्ट्रपतींनी कस्तुरबा गांधी यांचे वास्तव्य असलेले ‘बा’ निवास व बापूंच्या तत्कालीन कार्यालयास भेट देऊन पाहणी केली. आश्रम प्रतिष्ठानचे सचिव विजय तांबे यांनी बापूंचे निवास व त्यांच्याशी संबंधित अनेक बाबींची माहिती यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिली.
यावेळी राष्ट्रपतींनी चरख्यावर प्रत्यक्ष सूत कताई केली. आश्रम भेटीनंतर त्यांनी बापूकुटी परिसरात ‘बेल’ प्रजातीच्या वृक्षाचे रोपण केले. यावेळी प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी वानमती सी., विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल तसेच आश्रम प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.








