लता – आशा मंगेशकर रुग्णालयाचा कोनशिला समारंभ
लोकवाहिनी न्यूज,पुणे: नि:स्वार्थ बुद्धी आणि प्रामाणिकपणा असेल तरच सेवाकार्य यशस्वी होतात. खरी सेवा ही आपुलकीच्या भावनेतूनच निर्माण होते आणि याच आपुलकीमुळे समाजात आजही चांगुलपणा टिकून आहे. समाजानेही अशा सेवाकार्यात यथाशक्ती सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले. नि:स्वार्थ बुद्धीने आपुलकीने केलेली सेवा म्हणजेच धर्म होय, असेही ते म्हणाले.
नांदोशी (पुणे) येथे ‘लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’च्या कोनशिला समारंभात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मंजुषा नागपुरे, पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, आनंद भोसले आणि संस्थेचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आशाताई भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लतादीदी आणि आशाताई यांच्या संवेदनेतून उमटलेल्या स्वरांचे सामर्थ्य अलौकिक असून, त्यांचे संगीत कधीही खंडित होणार नाही, अशी भावना डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले, शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टींचाही जीवनावश्यक गरजांच्या यादीत समावेश करणे आवश्यक आहे.
प्रत्येकाला सुलभ व परवडणारे शिक्षण आणि आरोग्यसेवा मिळायला हवी. शासन व प्रशासन त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेच; परंतु ‘हा देश माझा आहे’ या भावनेने आपणही अशा कार्यात खारीचा वाटा उचलला पाहिजे. सेवा भावातील आपुलकी आणि चांगुलपणा म्हणजेच खरा धर्म आहे.








