वाढत्या उष्णतेमुळे १८ क्रीडा प्रकारांची निवड
लोकवाहिनी न्यूज:नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित देशातील पहिल्या ठरलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या ८ व्या पर्वाचे आयोजन ३१ मे ते ७ जून दरम्यान करण्यात आले आहे. या संदर्भात महोत्सवाचे संयोजक आणि माजी आमदार संदीप जोशी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.
याबाबत संदीप जोशी यांनी सांगितले की, दरवर्षी हा समारोह नागपूर शहर व जिल्ह्यासहित संपूर्ण महाराष्ट्राकरीता मागील पर्वांमध्ये आयोजित केला होता. परंतु नागपूर शहरातील यावर्षीचा उन्हाळा आणि त्याचे दररोज वाढणारे तापमान लक्षात घेऊन सर्व सहसंयोजकांनी ठरविले की ही क्रीडा साखळी खंडित न करता यावर्षीही हे पर्व संपन्न करावे. या पर्वात फक्त १८ क्रीडा प्रकाराची मेजवानी फक्त नागपूर शहरातील क्रीडापटूंसाठी असून, हा महोत्सव रविवार दि. ३१ मे ते ७ जूनपर्यंत संपन्न होणार आहे.
एकूण १८ क्रीडा प्रकार नागपूर शहरातील सर्व कानाकोपऱ्यातील २० मैदानांवर घेण्यात येणार असून सर्व मैदानी स्पर्धा फक्त रात्री घेण्याचे निश्चित केले आहे. या ८ व्या पर्वाची एकूण रोख पुरस्कार राशी ५७ लाख ६३ हजार तसेच सर्व क्रीडा प्रकारासाठी ट्रॉफीज व मेडल्स सुद्धा प्रदान करण्यात येणार आहे.
या पर्वामध्ये कुस्ती, मॅरेथॉन, खो-खो, बॅडमिंटन, ॲथलेटिक्स, कबड्डी, स्विमिंग, बास्केटबॉल, चेस, कॅरम, व्हॉलीबॉल, योगासन, जिमनॅस्टिक्स, स्केटिंग, टेबलटेनिस आणि सॉफ्टबॉल इत्यादी क्रीडा प्रकाराचा समावेश केला आहे. या १८ क्रीडा प्रकाराची जबाबदारी डॉ. पीयूष आंबुलकर, डॉ. पद्माकर चारमोडे, सचिन देशमुख, अशफाक शेख, डॉ. विवेक अवसरे, डॉ. संभाजी भोसले, अमित संपत, नागेश सहारे, नवनीत तुली, सचिन माधने, विशाल लोखंडे, संदेश खरे, लक्ष्मीकांत किरपाने, धनंजय उपासनी, सतीश वडे, सुनील मानेकर, डॉ. सौरभ मोहोड, प्रकाश चांद्रायण, निरज दोंतुलवार हे सर्व सहसंयोजक पार पाडणार आहेत.
वाढत्या तापमानामुळे उद्घाटन पहाटे ५.३० वाजता
यावेळी जोशी यांनी सांगितले की, सध्या नागपूरचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे याचा त्रास खेळाडूंना होऊ नये यासाठी उद्घाटन पहाटे ५.३० वाजता मॅरेथॉनच्या माध्यमातून केले जाणार आहे. याप्रसंगी नितीन गडकरी उपस्थित असतील. दरवर्षी या महोत्सवात विदर्भासह राज्यातील संघांना संधी दिली जात होती. परंतु वाढत्या तापमानामुळे हे पर्व नागपूर शहरापुरते मर्यादित ठेवण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवलेल्या सूचनांचे पालन करून महोत्सव यशस्वी करण्याचा आमचा प्रयत्न असेल








