अमरावती : भाजपा नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्यावर जोरदार पलटवार करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
अचलपूर-परतवाडा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या वातावरणात राणा यांनी खान यांच्या भूमिकेवर तीव्र टीका केली आहे.
नवनीत राणा यांनी म्हटले की, अमरावतीतील कोल्हे हत्याकांडाच्या वेळी पयार खान यांनी कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिली नव्हती. तसेच नाशिकमधील टीसीएस (TCS) प्रकरणातही त्यांनी मौन बाळगल्याचा आरोप त्यांनी केला. विविध संवेदनशील घटनांमध्ये अल्पसंख्याक आयोगाकडून अपेक्षित ती भूमिका दिसून आली नाही, असेही त्यांनी नमद केले.
राणा यांनी पुढे आरोप केला की, गरीब कुटुंबातील मुलींना जबरदस्तीने बुरखा परिधान करण्यास भाग पाडणे, तसेच जबरदस्तीने मांस खाण्यास लावण्याच्या घटना घडल्या असताना आयोगाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे अचलपूर-परतवाडा प्रकरणात अचानक दाखवलेली सक्रियता संशयास्पद वाटते, असे त्यांनी स्पष्ट केले.
महिला व मुलींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, त्या यापूर्वीही पीडितांच्या बाजूने ठामपणे उभ्या राहिल्या आहेत आणि पुढेही ठामपणे उभ्या राहणार आहेत. कोणत्याही मुलीवर अत्याचार करणे, तिचा व्हिडिओ व्हायरल करणे किंवा तिचा गैरवापर करणे, अशा प्रकारांना कधीही माफ केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.








