लोकवाहिनी न्यूज,नवी दिल्ली : घटनेत दुरुस्ती करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने सादर केलेली विधेयके दोन दिवसांच्या चर्चेनंतर लोकसभेत मंजूर होऊ शकली नाहीत. घटनादुरुस्ती विधेयक पारित करण्यासाठी उपस्थित सदस्यांच्या दोन-तृतीयांश मते मिळणे आवश्यक असते. तथापि, सरकारला त्यासाठी पुरेसे संख्याबळ मिळवण्यात अपयश आले.
विधेयकाच्या बाजूने २९८ तर विरोधात २३० मते पडल्याने हे विधेयक नामंजूर झाले. यामुळे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला जबरदस्त झटका बसला आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा विरोधकांच्या एकीचा विजय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाने एक ऐतिहासिक संधी गमावल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
पहिले घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्याने सरकारने उर्वरित दोन विधेयके लोकसभेत मांडण्यापासून माघार घेतली. या विधेयकाच्या बाजूने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सत्ताधारी पक्षातील विविध नेत्यांनी भूमिका मांडली. तर, विरोधी पक्षाकडून अखिलेश यादव, प्रियांका गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, अरविंद सावंत, अमोल कोल्हे, वर्षा गायकवाड, कल्याण बॅनर्जी यांच्यासह विविध पक्षांनी बाजू मांडली.
हे घटनादुरुस्ती विधेयक असल्याने मंजूर करण्यासाठी लोकसभेतील उपस्थित सदस्यांच्या दोन-तृतीयांश मतांची आवश्यकता असते. लोकसभेत या घटनादुरुस्ती विधेयकावर मतविभाजनाद्वारे मतदान घेण्यात आले. घटनादुरुस्तीच्या बाजूने पहिल्या फेरीत २९८ तर विरोधात २३० मते नोंदवली गेली. एकूण ५२८ खासदारांनी मतदान केले.






