नारी शक्ती वंदन कायद्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप
लोकवाहिनी न्यूज:नागपूर : भारतात पहिल्यांदा महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत संधी मिळत होती. मात्र काँग्रेस असा पक्ष आहे, ज्यांनी संख्याबळाच्या भरोशावर प्रतिगामी निर्णय घेतला, तेव्हा राहुल गांधींना महिला विषयावर आता बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
रविवारी नागपुरात त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले, भारत हा सामाजिक आणि आर्थिकबाबतीत महत्त्वाचा देश ठरेल, अशी १७ एप्रिलला अपेक्षा होती. महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर होणार होते. सर्वजण मदत करतील, अशी अपेक्षा होती. मात्र डीएमके, एनसीपी (शपा), समाजवादी, शिवसेना उबाठा, काँग्रेस यांनी महिलाविरोधी मानसिकतेचे प्रदर्शन केले, अशी संतप्त प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
लोकसभेत ५४३ जागा असतील, असे १९७१ साली ठरले होते. तेव्हा लोकसंख्या ४५ कोटी होती आणि आता १४० कोटी लोकसंख्या आहे. पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्टबरोबर प्रतारणा होईल. उत्तर आणि दक्षिण वाद संपवण्याचे प्रयत्न या विधेयकात केले होते. लोकशाहीत महिला सहभागाचा मृत्यू झाला आहे, हत्यारे विरोधी पक्ष आहेत. नेहमीच काँग्रेस आणि साथीदारांची अशी प्रवृत्ती राहिली आहे, त्यांनी सातत्याने महिला विरोधी धोरण अवलंबले, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली.
धामणगावच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घेऊ
भिवापूर तालुक्यातील धामणगावात आगीची दुर्दैवी घटना घडली. प्राथमिकदृष्ट्या त्या ठिकाणी शॉर्टसर्किट झाले असल्याची माहिती आहे आणि त्यानंतर वादळी वाऱ्यामुळे आग संपूर्ण गावात पसरली. सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे. काही जनावरांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने उत्तम मदतकार्य केले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वतः लक्ष ठेवून होते. ते स्वतः त्या ठिकाणी भेट देणार आहेत. येथील ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार पुढाकार घेईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.








