अधिकाऱ्यांना फोन आणि पत्राद्वारे सूचना
लोकवाहिनी न्यूजनागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमात यंदा पुन्हा एकदा ‘ऑन द स्पॉट’ निकालाची प्रचिती आली. नागरिकांनी मांडलेल्या समस्या आणि तक्रारींवर गडकरी यांनी त्याच क्षणी उपस्थित अधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या. तर काही प्रकरणांमध्ये फोनवरून संबंधितांना तातडीने समस्या सोडविण्याचे निर्देश दिलेत.
नागपुरातील वाढते तापमान लक्षात घेता यंदा सकाळच्याच सत्रात जनसंपर्क कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सकाळी ८.३० पासून नागरिकांची निवेदने स्वीकारण्यात आली. त्यानंतर गडकरी यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत कार्यवाहीचा विश्वास दिला. नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हाधिकारी कार्यालय आदी शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी जनसंपर्क कार्यक्रमाला उपस्थित होते. नागरिकांच्या तक्रारी ऐकताना गडकरी यांनी थेट संबंधित अधिकाऱ्याला लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या.
सकाळी साडेसातपासूनच नागरिकांनी जनसंपर्क कार्यालयात गर्दी केली होती. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, समाजसेवी संस्थांचे पदाधिकारी, धार्मिक संस्थांचे पदाधिकारी आदींनी यावेळी आपली निवेदने गडकरी यांना दिलीत. यावेळी विद्यार्थी वर्गाने देखील परीक्षांच्या व निकालाच्या संदर्भात आपल्या अडचणी गडकरी यांच्यापुढे मांडल्या. केवळ नागपूरच नव्हे तर परभणी, हिंगोली, अमरावती, अकोला, सोलापूर, कोल्हापूरसह इंदोर, बालाघाट, जबलपूर या महाराष्ट्राबाहेरील शहरांमधूनही नागरिक आपली निवेदने घेऊन जनसंपर्क कार्यक्रमात दाखल झाले होते.
गडकरी यांचे मानले आभार
विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून उपचारासाठी मिळणारी मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल अनेक रुग्णांनी गडकरी यांचे आभार मानले. मंत्री महोदयांनी दिलेला शब्द आणि कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेला पाठपुरावा यामुळेच ही मदत मिळणे शक्य झाल्याची भावना रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.









