मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : ‘दीपोत्सव २०२६’ या दिवाळी अंकाचे गुरुवारी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झाले. मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात मंचावर लोकवाहिनीचे मुख्य संपादक डॉ. प्रवीण महाजन, नागपूर आवृत्ती संपादक चारुदत्त कहू यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे नागपूर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, राज्याचे मंत्री आशीष जयस्वाल, आमदार परिणय फुके, आमदार संजय भेंडे, आमदार कृष्णा खोपडे आणि नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र उपस्थित होते.
दैनिक लोकवाहिनीच्या ‘दीपोत्सव’ या बहुरंगी दिवाळी अंकाचे हे दुसरे वर्ष असून, हा अंक महाराष्ट्रातील मान्यवर लेखकांच्या सहभागाने सिद्ध झालेला आहे. अंकासाठी लोकवाहिनी नागपूर आवृत्तीचे सहायक संपादक विजय गावंडे, मुंबई आवृत्तीचे संपादक प्रसाद मोकाशी आणि लोकवाहिनी हिंदी आवृत्तीचे संपादक राजेश नामदेव यांचे सहकार्य लाभले आहे. अंकाची मांडणी आणि सजावट वैशाली मोरे व कालिदास साव यांची असून, जाहिरात साह्य विवेक पारकर यांनी केले आहे. नारायण ऑफसेट वर्क्स, नागपूर येथे हा अंक प्रकाशित झाला असून, त्याची किंमत ३०० रुपये आहे.
दिवाळी अंक हा आपल्या सांस्कृतिक परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे. फराळाच्या ताटात चकली, लाडू, करंजी, चिवडा आणि शंकरपाळ्यांना जे स्थान असते, तेच स्थान दिवाळीच्या आनंदात दिवाळी अंकाला असते. दैनिक लोकवाहिनीचा ‘दीपोत्सव २०२६’ हा दिवाळी अंकही याच परंपरा पुढे नेणारा, विचारána चालना देणारा आणि मनोरंजनाची मेजवानी देणारा आहे.
यंदाच्या अंकातील साहित्य म्हणजे वैचारिक आणि मनोरंजनात्मक फराळाची सुंदर मेजवानी आहे. काही कथा वाचताना हास्याची कारंजी उडतील, तर काही लेख मनाला अंतर्मुख करतील. यंदाच्या वर्षात देशात आणि जगभरात आंदोलनाचे अनेक रंग पाहायला मिळाले. शिक्षणासाठी, भ्रष्टाचाराविरोधात, राजीनाम्याच्या मागणीसाठी तर कधी व्यवस्थेतील बदलासाठी विविध वयोगटातील लोक रस्त्यावर उतरले, या आंदोलनामागील अस्वस्थता नेमकी कशाची आहे? नवीन पिढी गोंधळलेली आहे की आपल्या हक्काविषयी अधिक जागरूक झाली आहे? तिच्या मनात नेमके कोणते विचार आहेत? या प्रश्नांचा वेध घेणारे लेख या अंकात समाविष्ट करण्यात आले आहेत.














