शांघाय शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी काढले पाकचे वाभाडे
लोकवाहिनी न्यूज
बिश्केक : दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात दुहेरी निकष असू शकत नाही, अशा कठोर शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी शांघाय सहकार्य परिषदेत जागतिक नेत्यांच्या उपस्थितीत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना सुनावले. तसेव, दहशतवाला बळ देणारी संपूर्ण यंत्रणा, ज्यात अर्थपुरवठा, भरती, कट्टरतावाद आणि सुरक्षित आश्रयस्थाने यांचा समावेश आहे, ती मोडीत काढण्याचे आवाहन केले.
बिश्केक येथे आयोजित २६ व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी दहशतवादाचे वर्णन संपूर्ण मानवतासमोरील गंभीर आव्हान असे केले आणि सांगितले की, याविरुद्धचा लढा केवळ कृती-प्रतिक्रिया या मानसिकतेपुरता मर्यादित राहू शकत नाही. आपल्याला दहशतवादाची संपूर्ण यंत्रणा, त्याचा अर्थपुरवठा, भरती, कट्टरतावाद आणि सुरक्षित आश्रयस्थाने मोडीत काढावी लागेल. या गंभीर मुद्द्यावर दुहेरी निकषांना कोणतेही स्थान असू शकत नाही, हे आपण एका सुरात ठासपणे सांगितले पाहिजे, असे मोदी म्हणाले.
जे देश दहशतवादाचा वापर आपल्या धोरणाचे साधन म्हणून करतात आणि दहशतवाद्यांना आश्रय व पाठिंबा देतात, त्यांना हा स्पष्ट संदेश दिला गेला पाहिजे की, दहशतवाद ही कोणासाहीठी सामरिक संपत्ती असू शकत नाही, असेही पंतप्रधान म्हणाले.
त्यांनी शांघाय परिषदेसाठी भारताच्या दृष्टीकोनाचे सुरक्षा, संपर्क आणि संधी हे तीन मुख्य आधारस्तंभ असल्याचे स्पष्ट केले; ज्यात शांतता आणि सुरक्षा हा पहिला स्तंभ आहे. शांततापूर्ण आणि सुरक्षित युरेशियासाठीची आपली सामाजिक आकांक्षा ही अफगाणिस्तानमधील शांतता आणि स्थिरतेशीही जोडलेली आहे, असे सांगत त्यांनी नमूद केले की, भारत अफगाण जनतेला विकास आणि मानवावादी मदत देणे सुरूच ठेवेल.
अमली पदार्थ तरुण पिढीसाठी धोकादायक
पंतप्रधानांनी अमली पदार्थांच्या तस्करीला तरुण पिढी आणि प्रादेशिक सुरक्षेसाठी एक गंभीर धोका असल्याचे नमूद केले. तसेव सुरक्षा धोके, संघटित गुन्हेगारी, माहिती सुरक्षा आणि अमली पदार्थ यासारख्या मुद्द्यांवर काम करणाऱ्या शांघाय सहकार्य संघटना यंत्रणांच्या माध्यमातून अधिक मजबूत सहकार्य करण्याचे आवाहन केले. आपण या यंत्रणांना प्रत्यक्ष समन्वय आणि वेळेवर कारवाईसाठी प्रभावी माध्यम बनवले पाहिजे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. किर्गिस्तानचे राष्ट्रध्यक्ष सादिर जापारोव्ह या शिखर परिषदेचे यजमानपद भूषवत आहेत आणि अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.







