लोकवाहिनी न्यूज
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श कार्याची गुढी जपण्याचे आणि त्यांच्या शिकवणीचा वारसा पुढे नेण्याचे महान कार्य छत्रपती सेवा प्रतिष्ठान करत आहे. असे प्रतिपादन पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटच्या काळे सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण समारंभात खासदार मेधा कुलकर्णी यांनी केले.
कुलकर्णी म्हणाल्या, छत्रपती शिवरायांचे जीवन आणि कार्य हे केवळ इतिहास नाही; ते आधुनिक काळातही मार्गदर्शन करत राहते. आमची जडणघडण शिवरायांच्या गोष्टी वाचून, अनुभवून झाली आहे. राजकारण करताना भगवंताचे अधिष्ठान आवश्यक आहे आणि हिंदुत्व, सनातन धर्म, देशप्रेम या मूल्यांवर आधारित भूमिका घ्यावी लागते. आजच्या देशातील परिस्थिती पाहता तटस्थ राहणे शक्य नाही.
छत्रपती सेवा प्रतिष्ठान तर्फे यंदाचा ४४ वा जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार समर्थभक्त रवींद्र पाठक यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वरूपात ५१ हजार रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ देण्यात आले. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते डॉ. बाबामहाराज तराणेकर, तर प्रमुख पाहुण्यांमध्ये श्री समर्थ रामदास स्वामी मठ, खातगावचे मठाधिपती मोहनबुवा रामदासी, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय देशमुख, विश्वस्त संजय देशकर उपस्थित होते. पुणेकरांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली.
पुढे कुलकर्णी म्हणाल्या की, या पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमातून प्रेरणा मिळते आणि हरिकथा निरुपणकारांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. डॉ. बाबा महाराज तराणेकर यांनी आपल्या संबोधनात सांगितले की, सनातन धर्म वेदांच्या निर्मितीपासून सुरू झाला असून, यज्ञांमधून धर्माचे बीज रुजले. संपूर्ण सृष्टीत धर्माची निर्मिती झाली, आणि जगात भागवत धर्म सर्वत्र आहे. ईश्वर एकच आहे, असे त्यांनी सांगितले. मोहनबुवा रामदासी यांनी मार्गदर्शन करताना रवींद्र पाठक यांची निवड योग्य असल्याचे मान्य केले.
त्यांनी म्हणाले, रामकथा रुजवण्याचे कार्य पाठक यांनी केले आहे. जसे विजयादशमीला छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार सज्जन गडावर घोड्यावरून जात, तसे समर्थ ज्या घोड्यावर थाप मारायचे त्या सरदाराला ‘सरदार’ पदवी दिली जात असे. पुरस्कार प्राप्त करताना रवींद्र पाठक म्हणाले, जिजामाता विद्वत पुरस्कार हे इतिहासात मोठ्या महार्थींस दिले गेले आहे.












