विद्यार्थ्यांचे हक्क मिळेपर्यंत लढा कायम
लोकवाहिनी न्यूज
छत्रपती संभाजीनगर : जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत हा संघर्ष सुरू राहील. आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि पारदर्शक शिक्षण व्यवस्थेसाठी लढा कायम ठेवला जाईल. असे कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी स्पष्ट केले.
परीक्षा आणि विविध सरकारी भरती प्रक्रियामध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराविरोधात सुरू असलेले आंदोलन आणखी व्यापक करण्याचा निर्धार दीपके यांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मागे घेतले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, देशाच्या कानाकोपऱ्यात हे आंदोलन पोहोचवण्यासाठी नवीन कृती आराखड्यावर काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. दिल्लीतील जंतर-मंतर येथे शनिवारी झालेल्या आंदोलनानंतर, रविवारी सकाळी दीपके आपल्या मूळ गावी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज एमआयडीसी परिसरात परतले. यावेळी कुटुंबीय आणि समर्थकांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आंदोलनाच्या पुढील टप्प्यांची माहिती दिली. दीपके म्हणाले की, देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या परीक्षा आणि भरती प्रक्रियामध्ये पारदर्शकता राहिलेली नाही. राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट), केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा (सीबीएसई), कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (सीयूईटी) तसेच कर्मचारी निवड आयोगाच्या (एसएससी) भरती प्रक्रियेबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या सर्व प्रकरणांमध्ये जबाबदारी निश्चित होणे आवश्यक असून, त्यासाठी आंदोलन छेडण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, जंतर-मंतर येथे आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला. देशातील विविध राज्यांत्तून विद्यार्थी, बेरोजगार युवक आणि सामाजिक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. अंदाजे ६ ते ७ हजार नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला. या प्रतिसादामुळे आंदोलनाला नवी ऊर्जा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत हा संघर्ष सुरू राहील. आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि पारदर्शक शिक्षण व्यवस्थेसाठी लढा कायम ठेवला जाईल, असे दीपके यांनी ठामपणे सांगितले.
यापुढे आंदोलन केवळ दिल्लीपुरते मर्यादित न राहता देशव्यापी स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विविध राज्यांमध्ये विद्यार्थी संघटना, सामाजिक संस्था आणि युवक गटांशी संपर्क साधला जात असून लवकरच व्यापक कृती कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. या संदर्भात स्वतंत्र नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान,
दीपकेच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवली
कॉकरोच जनता पक्षाचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके रविवारी सकाळी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यामुळे पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे, असे स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. रविवारी सकाळी दीपके छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आणि वाळूज एमआयडीसी परिसरातील त्यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले. वाळूज जिल्ह्यातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले, आम्ही आजपासून त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवली आहे. यापूर्वी ११ सुरक्षा कर्मचारी तैनात होते; आता ही संख्या १५ झाली आहे. हे कर्मचारी स्थानिक पोलिस ठाणे आणि शहर पोलिस मुख्यालयाकडून तैनात केलेले आहेत. असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दीपके यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. स्थानिक पोलिस प्रशासनाने खबरदारीचे उपाय म्हणून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून सुमारे १५ पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शनिवारी दिल्लीत पार पडलेल्या आंदोलनाला विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनीही उपस्थिती लावली.









