बेवारस-सत्य एका वळणावरचे या चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच करण्यात आला असून, या टीझरमध्ये चित्रपटातील हृदयस्पर्शी कथा, भावनिक उंची आणि कलाकारांच्या दमदार अभिनयाची झलक प्रेक्षकांना दिसते.
हरिणी प्रॉडक्शन्सच्या प्रस्तुतीतून तयार झालेल्या या चित्रपटाची प्रस्तुती शिव आर्यन फिल्म्सने केली आहे. चित्रपटाची निर्मिती सौ. रिया कुमार, नितीन विचारे आणि शिव आर्यन यांनी केली असून, कथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी विजय राणे आणि सौ. रिया कुमार यांनी हाताळली आहे. तसेच क्रिएटिव्ह दिग्दर्शन नितीन विचारे, शिरीष लाटकर यांनी केले आहे. पटकथा, संवाद लेखन, गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन विवेक आपटे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आले आहे, तर शीर्षकगीताचे लेखन सौ. रिया कुमार यांनी केले आहे आणि संगीत बिपलाब दत्ताचे आहे. छायांकन युजीन डिसोझा व योगेश कोळी यांनी केले असून, पार्श्वसंगीत अमीर हडकर यांनी सादर केले आहे, तर संकलन यश सुर्वे यांनी केले आहे. स्टार कास्टिंगची जबाबदारी नितीन विचारे यांच्यावर होती. चित्रपटातील कलाकारांची यादी खूप प्रभावी आहे. विक्रम गोखले यांच्यासह तेजस्विनी पंडित, रोहिणी हट्टंगडी, उषा नाईक, निहार गिते, ऋतुजा बागवे, उदय टिकेकर, श्रीजित मराठे आणि आदित्य देशमुख यांना प्रमुख भूमिका लाभल्या आहेत. विशेष म्हणजे, विक्रम गोखले यांनी या चित्रपटात अनाथालय चालवणाऱ्या तत्त्वनिष्ठ आबाजीची भूमिका साकारली आहे.
कथेचा मूळ प्रवाह एका पायाने अधू असलेल्या अनाथ मुलाच्या न्यायालयीन संघर्षावर आधारित आहे, ज्यामध्ये सामाजिक परिस्थितीचे विविध पैलूही चित्रित केलेले आहेत. टीझरमध्ये कथानकाच्या भावनात्मक बाजूची सुंदर झलक दिसते, तसेच विक्रम गोखले यांचा आर्त आणि भावपूर्ण अभिनय प्रेक्षकांच्या मनात घर करेल, असे वाटते. या कथेतून समाजातील काही कठीण वास्तवांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना फक्त मनोरंजनच नाही, तर विचार करायला लावणारी अनुभवही मिळेल. टीझरच्या प्रकाशनानंतर, प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता वेगाने वाढली आहे. हृदयस्पर्शी कथा, सक्षम कलाकार आणि दर्जेदार तांत्रिक कामगिरीमुळे बेवारस – सत्य एका वळणावरचे हा चित्रपट आगामी काळात मराठी चित्रपटसृष्टीत विशेष ठसा उमटवणार असल्याचे दिसते. चित्रपट संपूर्ण जगभरात २५ जून २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. टीझर पाहण्यासाठी https://youtu.be/tHLVGiFwFfE?si=53YdP-RAr9biJTzS या वेबसाईटवर बघा.









