लोकवाहिनी न्यूज:नागपूर : शेतात बेजबाबदारपणे तणकट व पालापाचोळ्याला लावलेली आग काही मिनिटात संपूर्ण गावाला आपल्या विळख्यात कशी घेऊ शकते याचा प्रत्यय २ मेच्या रात्री धामणगाव वासियांनी घेतला. नागपूर पासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या भिवापूर तालुक्यातील धामणगाव येथील या अचानक उद्भवलेल्या आगीच्या संकटाने गावकऱ्यांसह संपूर्ण प्रशासनाची परीक्षा घेतली. एका घरा पाठोपाठ तब्बल ५० पेक्षा अधिक घरे आणि जनावराचे गोठे काही मिनिटात आगीत होरपळले. घटनेची खबर मिळताच भिवापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र म्हसकर आपल्या १५ शिपायांसह गावात पोहचले. गावातील युवाशक्ती आणि पोलिसांनी क्षणात निर्णय घेऊन अगोदर अडकलेल्या माणसांना बाहेर काढण्यास प्राधान्य दिले. प्रशासन व गावकरी यांच्या एकीतून एवढ्या मोठ्या प्रमाणात आग लागूनही मनुष्यहानीचे गालबोट लागू शकले नाही.
२ मे रोजी सायंकाळच्या सुमाराला नागपूर जिल्ह्यात काही भागात वादळ वारा सुरु झाला. गावाशेजारी असलेल्या शेतातील तणकट, पालापाचोळा गोळा करुन एका शेतकऱ्याने त्याला आग लावली. पाहता पाहता ही आग वादळ वाऱ्याने गावात पसरली. अवघ्या काही मिनिटात ४०० उंबरठे असलेल्या धामणगावची १६ घरे व ३४ गोठे-झोपड्या या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सायंकाळची वेळ असल्याने काही गोठ्यामध्ये गाई तर काही गोठ्यामध्ये बकऱ्या बांधलेल्या होत्या. अचानक लागलेल्या या आगीने सारे गाव खडबडून जागे झाले. वेळेवर पोहचलेले पोलिस, महसूल विभागातील कर्मचारी आणि गावकऱ्यांनी एकमेकांच्या धैर्यातून संपूर्ण गावाला जीवितहानीपासून रोखण्यात यश मिळविले.
‘मी दिवसभराची कामे आटोपून सायंकाळी ६.४५ ला भिवापूर पोलीस स्टेशन येथेच हजर होतो. वादळ सुरु झाले होते तेवढ्यात आग लागल्याची घटना कानावर आली. वातावरण व हवेचा वेध लक्षात घेता त्वरीत मी व शिपाई असे पंधरा जण मिळून धामणगावाकडे कूच केली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी फोनवर संपर्क साधून आम्हाला दिशा दिली. रस्त्यात वादळाने काही ठिकाणी झाडेही पडली होती. येथून जवळ असलेल्या भिसी नगर पंचायतला कल्पना देऊन त्यांच्याकडून व नंतर भिवापूर, उमरेड येथून पाण्याचे अग्नीशमन दलाच्या पथकांना बोलावून घेतले. भीतीने व्याकुळ झालेल्या गावकऱ्यांना धीर देताच सारे गाव व गावातील युवाशक्ती आम्ही एक झाल्याने आगीत अडकलेल्या लोकांना सुखरुप काढण्यावर भर दिला व त्यात आम्हाला यश मिळाले’ असे भिवापूर पोलीस स्टेशनमधील सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र म्हसकर यांनी सांगितले.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व स्थानिक पदाधिकाऱ्यांना संपर्क साधून सर्व प्रकारची मदत तत्काळ धामणगावला पोहचविण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी आगीची व्याप्ती लक्षात घेऊन गावकऱ्यांसह जनावरांनाही दुसऱ्या दिवशी सकाळी आवश्यकत्या बाबी पोहचविण्यावर भर दिला. पशु वैद्यकीय विभागाने आगीतून वाचलेल्या जनावरांवर तत्काळ उपचाराचा कॅम्प सुरु केला. किराणा साहित्यापासून इतर मदत पोहचविण्याचे नियोजन केले.
महसूल विभागाकडून शंभर टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. यात सोळा घरे पूर्णत: क्षतीग्रस्त, नऊ अंशत: आणि चौतीस पूर्णत: नष्ट झालेले गोठे/झोपड्यांचा समावेश आहे. श्री. महालक्ष्मी संस्थान कोराडी यांच्याकडून सर्व बाधित कुटुंबांना २०.०० लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. याचबरोबर सर्व बाधित कुटुंबांना ७५ किराणा साहित्य किटचे वाटप करण्यात आले. पशु वैद्यकीय विभागाकडून बाधित असलेल्या २५ पशु पालकांना चारा उपलब्ध करुन दिला आहे. गावामध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा दररोज पुरवठा सुरु असून समाज मंदिर येथे आरोग्य शिबीर राबवण्यात येत आहे. शासनाकडून २५ संसार उपयोगी भांड्याचे किट आणि किमान १५ दिवस पुरेल असे किराणा किटचे वाटप आमदार डॉ. संजय मेश्राम यांच्याहस्ते करण्यात आले.
दोन दिवसीय विशेष शिबिरांचे आयोजन
आधारकार्ड, रेशनकार्ड, निवडणूक कार्ड इतर विविध प्रकारचे दाखले जर आगीत नष्ट झाले असतील तर अशा व्यक्तींसाठी दोन दिवसात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच वैद्यकीय पथकांमार्फत नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे. या आकस्मिक आगीमध्ये एकूण ९ इलेक्ट्रिक मीटर जळाले होते. यापैकी ९ मीटर महापारेषण कंपनीने बसवून दिले. जिल्हा खनिकर्म निधीतून आपतग्रस्त कुटुंबांना घर बांधणीसाठी अनुदान देण्याबाबत कार्यवाही सुरु केली आहे. याचबरोबर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अधिकाधिक मदत व्हावी यादृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.








