नासुप्रचे उच्च न्यायालयात माहिती देत दहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन
लोकवाहिनी न्यूज:नागपूर : सोनेगाव तलाव भरल्यानंतर परिसरात पसरत असलेल्या बॅकवॉटरमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्येवर उपाय म्हणून पावसाळी नाली उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आल्याची माहिती नागपूर सुधार प्रन्यासने (नासुप्र) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. या कामासाठी १३.६३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून कंत्राटदाराला कार्यादेशही देण्यात आला आहे.
या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांची दखल घेत न्यायालयाने स्वतःहून जनहित याचिका नोंदवली आहे. सुनावणीदरम्यान मांडण्यात आलेल्या माहितीनुसार, तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर आसपासच्या भागात गुडघाभर पाणी साचते. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण होते, तर अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरून मालमत्तेचे नुकसान होते. काहींना तात्पुरते स्थलांतर करण्याचीही वेळ येते. परिसराच्या भौगोलिक रचनेमुळे समस्या अधिक तीव्र होत असल्याचे निदर्शनास आले. एका बाजूला विमानतळाची उंच संरक्षक भिंत, तर दुसऱ्या बाजूला तलाव असल्याने मध्ये असलेल्या प्रसाद, ममता आणि पॅराडाईज इन या सोसायट्यांमध्ये पाण्याचा अडथळा निर्माण होतो.
नाल्यांचे चेंबर ओव्हरफ्लो झाल्यास सांडपाण्याचे पाणी रस्त्यावर पसरत असल्याचीही तक्रार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या संरक्षक भिंतीलगत विजय सोसायटी, शिवशक्ती सहकारी गृहनिर्माण संस्था मार्गे पॅराडाईज सहकारी गृहनिर्माण संस्थेपर्यंत पावसाळी नाली टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम दहा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे नासुप्रने न्यायालयाला सांगितले. या प्रकल्पामुळे परिसरातील पाण्याचा निचरा होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. न्या. अनिल किलोर व न्या. राज बाकोडे यांच्यासमोर या खटल्यावर सुनावणी झाली









