लोकवाहिनी न्यूज:नागपूर : नागपूर येथील प्रख्यात होमिओपॅथी तज्ज्ञ व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉ. विलास डांगरे यांना वर्ष २०२५ साठी ‘देवीलाल जयस्वाल भला माणूस पुरस्कार’ हा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर्षी पासूनच या पुरस्काराची सुरुवात करण्यात आलेली आहे. डॉ. विलास डांगरे यांच्यासारख्या सेवाभावी आणि जनहितार्थ काम करणाऱ्या व्यक्तीला आपला पहिलाच पुरस्कार देऊन ‘कृषी विकास प्रतिष्ठान’ या संस्थेने त्यांच्या भावी पुरस्कारांची दिशा निश्चित केलेली आहे.
स्वर्गीय देवीलालजी जयस्वाल हे नागपुरातील एक प्रसिद्ध उद्योजक होते. परंतु त्याहीपेक्षा ते समाज ऋण मानणारे व्यक्ती होते. त्यांनी आपल्या आयुष्यात हजारो रुग्णांना अर्थसाहाय्य, अन्नदान, गरजू विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य अशी अनेक कामे केलेली होती. प्रसिद्धी पराङ्मुख राहून त्यांनी केलेले हे कार्य समाजात लोकांनी पुढेही चालू ठेवावे या भावनेने समाजासाठी चांगले काम करणाऱ्या लोकांचा गौरव व्हावा, लोकांना त्यांची ओळख व्हावी यासाठी हा पुरस्कार दिला जातो. वैद्यकीय क्षेत्रात गेल्या अनेक दशकांपासून त्यांनी दिलेल्या निस्वार्थ सेवेबद्दल आणि समाजाभिमुख कार्याबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात येत आहे.
डॉ. डांगरे यांनी आपल्या दीर्घ सेवाकाळात हजारो रुग्णांवर उपचार करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. रुग्णांशी जिव्हाळ्याने संवाद साधणे, परवडणारी वैद्यकीय सेवा देणे आणि समाजसेवेची जाणीव जपणे ही त्यांची कार्यशैली विशेष ठरली आहे. यापूर्वी त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री हा सन्मान प्रदान करण्यात आला असून त्यांच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. आता ‘देवीलाल जयस्वाल भला माणूस’ पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याला आणखी एक सुवर्ण झळाळी मिळालेली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून समाजातील अनेकांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा, अशी भावना व्यक्त केली जात आहे. दिनांक १० मे रोजी बनियन हॉल, चिटणीस सेंटर सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे संध्याकाळी साडेपाच वाजता राज्याचे वित्त व नियोजन तसेच विधी व न्याय राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली व कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराड चे प्रमुख सल्लागार विद्यावाचस्पती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आलेले आहे.









