वितरण सोहळा १० मे रोजी
लोकवाहिनी न्यूज:नागपूर : संशोधन, जनजागृती आणि विविध घटकांमधील समन्वय क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्च, नागपूर’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे दिला जाणारा ‘स्व. भाऊसाहेब चांद्रायण स्मृती गौरव पुरस्कार २०२६’ केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष आहे. पायाभूत सुविधा विकास आणि लोककल्याण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळा रविवार, १० मे २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता द बॅलियन हॉल, चिटणवीस सेंटर येथे होणार असून सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्या हस्ते नितीन गडकरी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. हा कार्यक्रम निमंत्रितांसाठीच आहे.
स्व. भाऊसाहेब चांद्रायण हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्पित स्वयंसेवक होते. त्यांनी भारतीय मजदूर संघाच्या कार्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले. संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवन जगलेल्या भाऊसाहेबांचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. या प्रसंगी त्यांचे नातू डॉ. कपिल डी. चांद्रायण लिखित स्व. भाऊसाहेब चांद्रायण यांच्या संक्षिप्त चरित्र आणि आठवणींवर आधारित पुस्तकाचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे.
सन २०२५ हे स्व. भाऊसाहेब चांद्रायण यांचे जन्मशताब्दी वर्ष तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षांच्या प्रारंभाचे वर्ष असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विकास, संशोधन आणि सार्वजनिक जीवन या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हे पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. समाजावर सकारात्मक आणि अर्थपूर्ण प्रभाव निर्माण करणाऱ्या तसेच राष्ट्र व समाजाच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा सन्मान या पुरस्काराद्वारे करण्यात येणार आहे.








