दुष्काळग्रस्त भाग उद्याच जाहीर करणार : मुख्यमंत्री
लोकवाहिनी न्यूज
अमरावती : अमरावती विभागातील पिकांवर निर्माण झालेल्या संकटाची दखल घेत राज्य सरकारकडून दुष्काळग्रस्त भाग जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दुष्काळ संहितेतील ट्रिगर-१ अनुसार दुष्काळ जाहीर करण्याचा शासन निर्णय उद्या काढण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. एखादा भाग या प्रक्रियेतून सुटला तर ट्रिगर-३ अनुसार त्याचा समावेश केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अमरावती विभागातील परिस्थितीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमरावती विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, सध्या सर्वच पिकांवर संकट निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारे दिलासा देता येईल, यासाठी दौरा करण्यात आला. दुष्काळग्रस्त भागात चारा व पाणीटंचाई दूर करण्याबरोबरच अन्नधान्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी शासनाकडून उपाययोजना केल्या जातील. शेतकऱ्यांना थेट हेक्टरी मदत देण्याची कार्यवाहीही केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.













