दहावीचा निकाल ९२.९ टक्के; कोकण विभाग अव्वल
लोकवाहिनी न्यूज:पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून, यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.९ टक्के लागला आहे. कोकण विभागाने सर्वाधिक ९७.६२ टक्के निकालाची नोंद केली, तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वांत कमी म्हणजे ८८.४१ टक्के लागला आहे.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. या सर्व विभागांचा निकाल एकाच वेळी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाला आहे.
राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. यावेळी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर आणि मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी उपस्थित होते.
पुणे, मुंबई, नाशिक, लातूर, अमरावती, नागपूर, कोकण, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. यंदा १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
निकालात मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. मुलांचा उत्तीर्णतेचा टक्का ८९.५६ इतका राहिला, तर मुलींचा निकाल ९४.९६ टक्के लागला. गेल्या वर्षी राज्याचा निकाल ९४.१० टक्के होता.








