लोकवाहिनी न्यूज:चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. तामिळनाडू वेत्री कळघमचे (टीव्हीके) संस्थापक जोसेफ विजय यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये त्यांना पदाची शपथ दिली. राज्यात पहिल्यांदाच एका गैर-द्रविड पक्षाने सरकार स्थापन केले आहे. नवीन सरकार स्थापन झाल्याने द्रमुक (डीएमके) आणि एआयएडीएमके (आयएडीएमके) यांचे अनेक दशकांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. विजय यांच्यासोबत आणखी नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. आता विजय यांना १३ मे पर्यंत विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करावे लागेल.
विजय यांनी शपथ घेताच स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट आणि घोषणाबाजी झाली. विजय यांच्या शपथविधीनंतर एन. आनंद, आधव अर्जुन, अरुणराज, सेंगोट्टैयन, व्यंकटरमणन, निर्मलकुमार, राजमोहन, डी.के. प्रभू आणि कीर्तना यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. कीर्तना एस. सध्या विजय यांच्या मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री आहेत.
या सोहळ्याला विजय यांचे कुटुंबीय, चित्रपट क्षेत्रातील व्यक्ती आणि आघाडीतील पक्षांचे नेते उपस्थित होते. काँग्रेस नेते राहुल गांधीही हजर होते. २०२६ हे वर्ष तामिळनाडूच्या राजकारणातील एका नव्या पर्वाची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे. शपथविधी सोहळ्यात ‘तमिळ थाई वंदना’ या गीताऐवजी, प्रथम ‘वंदे मातरम’ वाजवण्यात आले आणि त्यानंतर राष्ट्रगीत सादर करण्यात आले, त्यानंतर ‘तमिळ थाई वंदना’ सादर करण्यात आली.
तामिळनाडू सरकारच्या कार्यक्रमांची सुरुवात सामान्यतः ‘तमिळ थाई वंदना’ने होते आणि समारोप राष्ट्रगीताने होतो, परंतु या सोहळ्यात एक वेगळा क्रम होता. या सोहळ्याने राज्यातील दोन प्रमुख पक्ष, डीएमके आणि एआयएडीएमके, यांच्यातील जवळपास सहा दशकांच्या आलटून पालटून चाललेल्या राजवटीचा अंत झाला आहे.









