जल जीवन मिशनच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह
लोकवाहिनी न्यूज:पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्याच्या विवळवेढे ग्रामपंचायतीतल्या कातकरीपाड्यातील आदिवासी समाज आजही पिण्याच्या पाण्यासाठी गंभीर संघर्ष करत आहे. राज्य सरकारच्या जल जीवन मिशनअंतर्गत घरोघरी स्वच्छ पाणी उपलब्ध होण्याचे दावे असूनही प्रत्यक्षात पाड्याच्या लोकांपर्यंत पिण्याचे स्वच्छ पाणी पोहोचत नाही, हे वास्तव उघड झाले आहे.
कातकरीपाड्यातील तब्बल २५० ते ३०० लोकवस्तीच्या गावातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी प्रतिदिन मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत असून, ग्रामस्थ महिलांना, वृद्धांना आणि लहान मुलांना सुमारे १ किलोमीटर चालत जाऊन डबक्यापर्यंत पोहचावे लागते, तिथून पाणी भरून आणले जाते. धक्कादायक बाब म्हणजे, या डबक्यातून ग्रामस्थ जसे पाणी घेतात, तसेच जनावरेही पाणी पितात. त्यामुळे दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारांचा धोका वाढल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, त्यांनी अनेकवेळा ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाकडे पिण्याच्या पाण्याबाबत तक्रारी केल्या; मात्र आश्वासनांच्या पलीकडे कोणतीही ठोस उपाययोजना झाली नाही. यामुळे आदिवासी समुदायाचा संताप वाढला असून, स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणावर टीका केली जात आहे.
ग्रामस्थांनी सांगितले की, उन्हाळ्याच्या तळपत्या तापमानात लहान मुलांसह पाणी पिण्यासाठी पायपीट करणे ही एक गंभीर समस्या आहे. आम्हाला आजही मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. जर तात्काळ कायमस्वरूपी पाणीपुरवठा सुरू केला गेला नाही, तर आम्ही आंदोलन सुरू करू, असे ग्रामस्थांनी जोरदार इशारा दिला. या पार्श्वभूमीवर, ग्रामस्थांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत, पिण्याच्या पाण्यासाठी रोज सुमारे १ किलोमीटर चालावे लागते. डबक्यातील गढूळ पाणी जनावरांसोबत सामायिक करावे लागते. ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी केल्या तरी उपाययोजना नाही. जल जीवन मिशनच्या घोषणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तात्काळ कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली. समस्या कायम राहिल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, ही परिस्थिती आदिवासी कातकरी समाजाला अजूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे दर्शवते. सरकारच्या विकासाच्या दाव्यांवर प्रश्न निर्माण करणाऱ्या या घटनेने प्रशासनाची दक्षता अनिवार्य केली आहे. विशेष म्हणजे, विवळवेढे ग्रामपंचायतीतील महालक्ष्मी मंदिरासह या परिसरात येणाऱ्या भाविकांना आणि स्थानिक रहिवाशांना या पाणी संकटामुळे मोठी अडचण भासत आहे. पाणीपुरवठा सुरळीत नसल्यामुळे, आरोग्याचा धोका, उन्हाळ्याचा ताण आणि सामाजिक असमानता या समस्या अधोरेखित होत आहेत.









