मुख्यमंत्री फडणवीस यांचे भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन
लोकवाहिनी न्यूज,नागपूर : केवळ विकासकामे किंवा उत्तम भाषणे करून नेतृत्व सिद्ध होत नाही, तर सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या तुमच्या व्यक्तिगत व्यवहारामुळे आणि नात्यामुळे खरे नेतृत्व घडते, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नागपूर महानगरतर्फे आयोजित प्रशिक्षण वर्गामध्ये व्यवहारिक सत्र घेताना केले.
भारतीय जनता पार्टी, नागपूर महानगरच्या वतीने आयोजित ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान-२०१६’ अंतर्गत दोन दिवसीय निवासी महानगर प्रशिक्षण वर्गाच्या समारोपीय सत्रात ते बोलत होते.
वर्धा रोड येथील अॅब्रोशिया फार्म येथे आयोजित या दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन ९ मे रोजी भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भारतमाता पूजनाने या वर्गाची सुरुवात झाली. यावेळी मंचावर प्रदेश उपाध्यक्ष उपेंद्र कोठेकर, आमदार प्रवीण फुके, खासदार मायाताई इवनाते, संजय भेंडे, माजी आमदार गिरीश व्यास, माजी आमदार अनिल सोले, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, अभियानाचे विदर्भ संयोजक धर्मपाल मेश्राम, उपमहापौर लीला हाथीबेड, सत्तापक्ष नेता बाल्या बोरकर, श्रीकांत देशपांडे, अशोक मेंढे आदी उपस्थित होते.
या निवासी वर्गामध्ये विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथम सत्रात डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी ‘कार्य पद्धती’ विषयावर मार्गदर्शन केले व या सत्राचे अध्यक्ष स्थान परिणय फुके यांनी भूषविले. दुसऱ्या सत्रात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘केंद्र व राज्य सरकारची गरीब कल्याणकारी योजना’ या विषयावर मार्गदर्शन केले व या सत्राचे अध्यक्ष स्थान खासदार मायाताई इवनाते यांनी भूषविले. तिसऱ्या सत्रात संजय फांजे यांनी ‘बूथ व्यवस्थापन, मन की बात आणि सोशल मीडिया’ या विषयावर मार्गदर्शन केले व या सत्राचे अध्यक्ष स्थान अर्चना डेहनकर यांनी भूषविले. चौथ्या सत्रात डॉ. राजीव पोतदार यांनी ‘कार्यकर्ता विकास’ विषयावर मार्गदर्शन केले व या सत्राचे अध्यक्ष स्थान डॉ. मिलिंद माने यांनी भूषविले. पाचव्या सत्रात प्रा. अनिल बोंडे यांनी ‘देशासमोरील आव्हाने’ विषयावर मार्गदर्शन केले व या सत्राचे अध्यक्ष स्थान प्रा. संजय भेंडे यांनी भूषविले.
सहाव्या सत्रात गिरीश व्यास यांनी ‘कार्य विस्तार: आमची दृष्टी’ या विषयावर मार्गदर्शन केले व या सत्राचे अध्यक्ष स्थान श्रीकांत देशपांडे यांनी भूषविले. सातव्या सत्रात किरण पातुरकर यांनी ‘विचार परिवार’ या विषयावर मार्गदर्शन केले व या सत्राचे अध्यक्ष स्थान अशोक मेंढे यांनी भूषविले. आठव्या सत्रात प्रा. अनिल सोले यांनी ‘आपला इतिहास व विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले व या सत्राचे अध्यक्ष स्थान धर्मपाल मेश्राम यांनी भूषविले. नवव्या सत्रात दयाशंकर तिवारी यांनी ‘वैचारिक अधिष्ठान’ या विषयावर मार्गदर्शन केले व या सत्राचे अध्यक्ष स्थान गिरीश देशमुख यांनी भूषविले. दहाव्या सत्रात कौस्तुभ फलटणकर यांनी ‘सोशल मीडिया, अॅप्स, नमो आणि सरळ अॅप’ या विषयावर मार्गदर्शन केले व या सत्राचे अध्यक्ष स्थान समीर बाकरे यांनी भूषविले.
अकराव्या व व्यावहारिक सत्रात मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले व या सत्राचे अध्यक्ष स्थान दयाशंकर तिवारी यांनी भूषविले. यावेळी नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार संजय भेंडे यांचा सत्कार करण्यात आला तर नवनिर्वाचित प्रदेशाचे उपाध्यक्ष उपेंद्र कोठेकर यांचा सत्कार दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते करण्यात आला. या दोन दिवसीय अभ्यास वर्गात संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी सुद्धा करण्यात आली होती सोबतच योगासनाने सकाळची सुरुवात करण्यात आली.
या दोन दिवसीय निवासी वर्गासाठी नागपूर महानगरातील सुमारे १५० महानगरातील प्रमुख पदाधिकारी अपेक्षित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी संचालन प्रशिक्षण वर्ग प्रमुख संदीप जाधव यांनी केले, सोबत महामंत्री श्रीकांत आगलावे, रितेश गावंडे, संपर्क महामंत्री विष्णू चांगदे यांनी सहकार्य केले. वर्गाची व्यवस्था म्हणून कार्यालय मंत्री ब्रिजभूषण शुक्ला यांच्या मार्गदर्शनात विविध समितींनी जबाबदारी सांभाळली. वर्ग व्यवस्था म्हणून प्रा. प्रमोद पेंडके, भोजराज डुंबे व प्रा. गिरीश देशमुख यांनी सांभाळली. मंचव्यवस्था अश्विनी जिचकार यांनी बघितली, तर महिला निवास व्यवस्थेची जबाबदारी दिव्यतार्इ धुरडे व मनीषा अतकरे यांनी यशस्वीपणे पार पाडली. नोंदणी व्यवस्था सुमित मिश्रा व शिशिर त्रिपाठी यांनी सांभाळली, तर भोजन व्यवस्थेचे नियोजन सचिन करारे, रितेश पांडे, रिषभ अरखेल व अथर्व त्रिवेदी यांनी केले.
कार्यकर्त्यांना पक्षाची विचारधारा आणि सरकारच्या योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कौशल्य प्राप्त व्हावे, हा या वर्गाचा मुख्य उद्देश असल्याचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी आभार प्रदर्शनात सांगितले. या प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून आगामी काळात संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याची रणनीती यावेळी आखण्यात आली. ■






