‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’चा शुभारंभ
लोकवाहिनी न्यूज,नागपूर : आकर्षक रांगोळी, मन प्रसन्न करणारी आरास आणि मंत्रोच्चाराच्या स्वरांनी महाल येथील कल्याणेश्वर मंदिर परिसर उजळून गेला. केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालय, आणि राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या निर्देशानुसार, नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व – अतूट आस्था की गौरव गाथा’ या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून भक्ती, श्रद्धा आणि संस्कृतीचा भव्य संगम सोमवारी सकाळी नागपूरकरांनी अनुभवला. यावेळी मातृशक्तीद्वारा भगवान शिव चे रुद्राभिषेक करण्यात आले.
महापौर नीता ठाकरे, आमदार प्रवीण दटके, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमनाथ स्वाभिमान पर्वचा भव्य प्रारंभ झाला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटानेल्या आभा बिज्जू पांडे, शिवसेना गट गणेश चोळेंवार, गांधीबाग झोनच्या सभापती उमा देशमुख, नगरसेवक सुधीर राऊत, महिला व बाल कल्याण विशेष समिती सभापती सारिका नांदुरकर, आरोग्य विशेष समिती सभापती मनीषा अतकरे, कर आकारणी व कर संकलन विशेष समिती सभापती सरिता कांबरे, अग्निशमन विशेष समिती सभापती रुपाली ठाकूर यांसह इतर नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह मनपा उपायुक्त मंगेश खवले आणि क्रीडा व सांस्कृतिक अधिकारी डॉ. पियुष अतकरे, कर आकारणी व कर आंबुलकर प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत कल्याणेश्वर मंदिर भव्य पूजा करण्यात आली.
सोमनाथ मंदिराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचा गौरव करण्याच्या या पर्वानिमित्त कल्याणेश्वर मंदिर भक्तिमय गीत-भजन, ११ हजार ‘ॐ नमः शिवाय’ जप तसेच रुद्राभिषेक करण्यात आला. यावेळी महिलांनी पौरोहित्य केले. तसेच येथील सोरटी सोमनाथ येथे केलेल्या उद्घाटन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना महापौर ठाकरे म्हणाल्या की, भारताच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक वारशामध्ये सोमनाथ मंदिराला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. परकीय आक्रांतांनी देशाच्या धार्मिक संस्कृतीवर आघात केल्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे सोमनाथ मंदिर. स्वातंत्र्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे झाले. त्या घटनेला आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त आज शहरातील प्राचीन आणि भक्तांच्या भक्तिभावाचे श्रद्धेचे स्थान असणाऱ्या महाल येथील कल्याणेश्वर मंदिरात हे पावन पर्व साजरे करण्यात आल्याचा मला आनंद आहे. देशाची विश्वगुरू होण्याकडे वाटचाल ही सनातनशिवाय पूर्ण होऊ शकत नसल्याचे सांगत महापौरांनी समाजाला चांगली दिशा देण्याचे महिलांमध्ये निसर्गदत्त गुण असतात, अशी एक चांगली दिशा आजच्या कार्यक्रमात महिलांनी केलेल्या पौरोहित्याचे मध्यातून दर्शविली असल्याचेही सांगितले.
तर दयाशंकर तिवारी यांनी संपूर्ण देशात सोमनाथ स्वाभिमान पर्व साजरे होत असल्याचे सांगत यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच कल्याणेश्वर मंदिराच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्य शासनाने ९० कोटी रुपयांचे प्रावधान केले आहे, यामुळे नागपूरच्या प्राचीन मंदिराला नवीन वैभव प्राप्त होणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी सोमनाथ मंदिराचा संपूर्ण इतिहास आणि ऐतिहासिक महत्त्व उपस्थितांना सांगितले. देशाचा इतिहास जिवंत राखण्यासाठी आणि त्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.







