लोकवाहिनी न्यूज:भोपाळ : केरळमधील तिरुवनंतपुरम येथून हजरत निजामुद्दीनकडे (दिल्ली) जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना रविवारी पहाटे अचानक आग लागल्याने घबराट पसरली. ही घटना मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील अलोट भागातील लुनी रिछा आणि विक्रमगड अलोट स्थानकांदरम्यान घडली. आगीनंतर तत्काळ १५ मिनिटांत ६८ प्रवाशांना सुखरूप डब्यातून बाहेर काढण्यात रेल्वेला यश आले.
ही घटना पहाटे ५.१५ ते ५.३० च्या दरम्यान घडल्याची माहिती आहे. गाडी क्रमांक १२४३१ तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस पहाटे ३.४५ च्या सुमारास रतलाम जंक्शनवरून निघाली, तिचा पुढील थांबा कोटा जंक्शन येथे होता. मात्र, राजस्थानमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच ट्रेनचा अपघात झाला.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ट्रेनच्या गार्डला सर्वप्रथम बी-१ डब्यातून धूर आणि आगीच्या ज्वाळा निघताना दिसल्या. त्याने तत्काळ लोको पायलटला सतर्क केले, ज्याने आपत्कालीन ब्रेक लावून ट्रेन त्वरित थांबवली. रेल्वे कर्मचारी आणि स्टाफने तत्परतेने कारवाई करत १५ मिनिटांत सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर त्यांना इतर डब्यांमध्ये हलवण्यात आले. वेळेवर बचावकार्य झाल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण आगीमुळे डब्याचे मोठे नुकसान झाले. (पान ६ वर)










