लोकवाहिनी न्यूज
अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाणे हद्दीतील तपोवन जंगल परिसरात जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या अनोळखी तरुणीचा खुनाचा उलगडा करण्यात अमरावती शहर गुन्हे शाखेला यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या तरुणीची हत्या तिच्याच मावस भावाने केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, ओळख पटू नये म्हणून आरोपीने मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याची कबुली दिली.
तपोवन संस्थेच्या पडीत जागेत २ जून रोजी एका तरुणीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. गाडगेनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलीस आयुक्तांनी गुन्हा तातडीने उघड करण्याचे निर्देश दिले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेने चार स्वतंत्र पथके तयार करून तपास सुरू केला. अमरावती शहर व ग्रामीण भागातील बेपत्ता महिलांची माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीदारांच्या मदतीने मृत तरुणीची ओळख काजल जितेंद्र इंगळे (वय २२, मूळ रा. विश्रोळी, ता. चांदूर बाजार, सध्या रा. तेजस विहार, राजुरा, अमरावती) अशी पटविण्यात आली.
मात्र घटनास्थळ दुर्गम जंगल परिसरात असल्याने आणि परिसरात कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने तपासात मोठे आव्हान निर्माण झाले होते. तरीही गुन्हे शाखेच्या पथकाने अथक परिश्रम घेत घटनास्थळापासून दूरवरच्या विविध भागांतील ३०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित चेतन सुनील थोरात (वय २३, रा. तेजस विहार, राजुरा, अमरावती) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मृत तरुणी त्याची मावस बहीण असल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपीने खून केल्यानंतर तरुणीची ओळख पटू नये म्हणून मृतदेहावर पेट्रोल टाकून तो जाळला. तसेच मोबाईल व इतर पुरावे नष्ट करून पाण्याच्या उद्देशाने घटनास्थळावरून दूर फेकून दिल्याची माहिती त्याने दिली. संबंधित वस्तू जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.










