मान्सूनचा प्रवेश अद्यापही दूरच
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : विदर्भात उष्णतेची लाट आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागपूरसह काही शहरात अधूनमधून वादळी वारा, ढगांचा गडगडाट आणि पावसाच्या सरी कोसळत असल्या तरीही मोसमी पावसासाठी मात्र किमान दहा दिवस तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे. हवामान अभ्यासकांच्या मते येत्या २० जूनपर्यंत तरी विदर्भात मोसमी पावसाचे आगमन नाही.
विदर्भात उष्णतेची लाट आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता असून, बहुतांश भागात मान्सूनपूर्व स्थितीच राहणार असल्याचे प्रादेशिक हवामान केंद्राने स्पष्ट केले आहे. पुढील चार दिवस कमाल तापमानात विशेष बदल अपेक्षित नसून त्यानंतर दोन ते चार अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसासह मेघगर्जना व सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी नागपूर शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या असल्या तरीही वाऱ्यांचा वेग अधिक होता. सोबतच ढगांचा गडगडाटही कायम होता.
शुक्रवारी विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. चामोर्शी, मुल, पवनी आणि सावली येथे पावसाची नोंद झाली. मात्र, बहुतांश भागात उष्णतेची तीव्रता कायम राहिली. वर्धा येथे राज्यातील सर्वाधिक ४४.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १३ ते १६ जूनदरम्यान नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. मात्र, अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यांत बहुतांश काळ कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. नागपूरसह काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत असल्या तरीही उकाडा मात्र कमी झालेला नाही.
विदर्भातील अनेक भागांत उष्णतेची लाट कायम राहणार असून १३ आणि १४ जून रोजी विशेषतः नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत उष्णतेची लाट आणि मेघगर्जनेसह ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा आहे. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ५० ते ६० किलोमीटर प्रतितासपर्यंत पोहोचू शकतो. एकूणच, मान्सूनच्या पुढील प्रगतीकडे लक्ष लागले असताना विदर्भातील नागरिकांना आणखी काही दिवस उकाडा, उष्णतेची लाट आणि तुरळक मेघगर्जनांचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.








