सक्करदरा लूट प्रकरणातील आरोपीची कबुली
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : शेअर बाजारात ट्रेडिंग करण्याची सवय लागली. त्यातून मोठे नुकसान झाले. हातात काहीही कामधंदा नव्हता. लोकांचे पैसे द्यायचे होते. नुकसान भरून काढायचे होते. घरही चालवायचे होते. काय करावे, हे सुचत नव्हते. त्यामुळे आपण बँक लुटण्याची योजना आखली. सक्करदरा परिसरात असलेल्या एसबीआय बँकेत चोरी करणाऱ्या सूरज बोरकर याने ही कबुली दिली.
उपयुक्त रश्मिता राव आणि सक्करदरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक रमेश खुणे यांनी लोकवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. गेल्या अनेक दिवसांपासून सूरज बेरोजगार होता. शेअर बाजारात ट्रेडिंग करण्याची त्याला सवय होती. ट्रेडिंग करताना त्याला मोठ्या प्रमाणावर आर्थिक तोटा झाला. तोटा कसा भरून काढायचा, याचा विचार करत असताना त्याने बँक लुटण्याचा प्रयत्न केला.
कर्मचाऱ्यांचे डोळे वाचले
सूरजने बँक लुटण्याचा प्रयत्न करताना एसबीआय कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकाली. घटनेनंतर या सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले. आता या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे एसबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आर्थिक कारणांमुळे सूरजने आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास सक्करदरा पोलिसांनी सुरू केला आहे.











