लोकवाहिनी न्यूज
गडचिरोली : कॉन्ट्रॅक्टरचे सहा लाख रुपयांचे देयक काढून देण्यासाठी दोन टक्क्याप्रमाणे १२ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता नितीन बारहाते यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी दुपारी रंगेहात पकडले, या प्रकरणात शिपाई ईश्वर निसार खल्हडी अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यावर लाचखोरीच्या आरोпаखाली कारवाई झाल्याने जिल्हा परिषदेसह प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत केलेल्या कामापैकी एका कॉन्ट्रॅक्टरचे सहा लाख रुपयांचे देयक प्रलंबित होते. हे देयक काढून देण्यासाठी कार्यकारी अभियंता नितीन बारहाते यांनी दोन टक्क्याप्रमाणे १२ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित कॉन्ट्रॅक्टरने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने मंगळवारी (२८ ऑक्टोबर) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषद परिसरात सापळा रचला. वेळेली शिपाई ईश्वर निसार यांच्या माध्यमातून लाचेची रक्कम स्वीकारली जात असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, कॉन्ट्रॅक्टरकडून १२ हजार रुपये स्वीकारताना कार्यकारी अभियंता नितीन बारहाते यांना त्यांच्या कार्यालयातच पकडण्यात आले. या कारवाईत विभागाचे गडचिरोली येथील शिपाई निसार यालाही अटक करण्यात आली.













