भाजपची मागणी प्रशासनाने फेटाळली
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ३८ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीसाठी एकूण दोन लाख ५५ हजार ६०३ मतदारांची नोंदणी झाली होती. त्यापैकी एक लाख ६५ हजार ६७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत पहिल्या पसंतीक्रमांकाची सर्वाधिक मते भाजपचे सुधाकर कोहळे यांना मिळाली. तर काँग्रेसचे अभिजित वंजारी यांना ५६६३० मत मिळाली होती. तर नितेश कराळे यांना २४,२४९ मते मिळाली, तर १५ हजार ३२ मते अवैध ठरली. विजयासाठी ७४,४३८ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. कोहळे यांना पहिल्या पसंतीक्रमाच्या फेरीत ४२९४ मतांची आघाडी होती. परंतु कोटा पूर्ण करता आला नसल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात येत आहे.
तब्बल १५ हजार ३२ मते अवैध ठरली आहेत. काही मतदारांनी मतपत्रिका कोरी सोडली, तर काहींनी पसंतीक्रमाऐवजी ‘राईट’ची खूण केली. काहींनी क्रमांक लिहून त्याभोवती गोल केला, तर काहींनी उमेदवाराच्या छायाचित्रजवळ पसंतीक्रम नोंदविला. काही मतदारांनी थेट उमेदवारासमोर ‘२’ हा क्रमांक लिहिला, तर काहींनी उमेदवाराच्या मतपत्रिकेवरील क्रमांकच पसंतीक्रम म्हणून नोंदविला. अशा विविध प्रकारच्या चुका झाल्याने अनेक मते अवैध ठरली.
मतमोजणीत १५ हजार ३२ मते अवैध ठरली. यात बहुतांश मते ही भाजपच्या कोहळे यांची असण्याचे सांगण्यात येते. मतदारांनी कोहळे यांच्या नावासमोर १ क्रमांक लिहून त्यावर गोल केला. प्रशासनाकडून अशी मते अवैध ठरविण्यात आली. त्यामुळे भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी अवैध ठरविण्यात आलेल्या मतांची फेरतपासणी करण्याच्या मागणीचा अर्ज निवडणूक प्रशासनाकडे दिला. कोहळे यांनीला याला दुजोरा दिला. मतमोजणीच्या वेळेस सर्वच प्रतिनिधींना मते दाखविण्यात आली. त्यानंतर ती अवैध ठरविण्यात आल्याचा दाखला देत कोहळे यांचा अर्ज नामंजूर करण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.











