लोकवाहिनी न्यूज नागपूर : एसआयआरच्या नावाखाली महाराष्ट्रात विरोधकांच्या मतांची छाटणी करून, जनतेच्या मनातून उतरलेले सरकार पुन्हा सत्तेत येण्यासाठी धडपड असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. महाराष्ट्रातील एसआयआर प्रक्रियेत अनअकाउंटेबल ठरविण्यात आलेल्या मतदारांची पारदर्शक आणि सविस्तर माहिती निवडणूक आयोगाने जनतेसमोर जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली. वडेट्टीवार म्हणाले, आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार स्थलांतरित, मृत आणि दुबार नोंदी असलेल्या मतदारांबाबत सुमारे २ कोटी ६६ लाख ८८ हजार ४७८ मतदारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यातील ७६ लाखांहून अधिक मतदार स्थलांतरित, ४५ लाखांहून अधिक मतदार गैरहजर, तर सुमारे ६२ लाख ४८ हजार मतदारांच्या नोंदीमध्ये विसंगती असल्याचे सांगितले जात आहे. एवढ्या मोठ्या संख्येने मतदार अंतिम यादीतून वगळले जाण्याची शक्यता गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘चंद्रपूरचा मतदार नागपुरात आला किंवा गडचिरोलीचा मतदार नागपुरात आला, तर तो महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित कसा?’ असा सवाल करत वडेट्टीवार यांनी आयोगाच्या स्थलांतरित मतदारांच्या आकडेवारीवर प्रश्न उपस्थित केला. बीएलओ प्रत्येक घरी गेले होते का, ७६ लाखांहून अधिक मतदार स्थलांतरित असल्याचे आयोगाने कसे निश्चित केले, याचे उत्तर आयोगाने द्यावे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. विरोधीकांच्या मतदारसंघांत मतदारसंघाच्या कमी होत आहे. सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघात तशी घट दिसत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. अंतिम यादीपूर्वी पडताळणीची प्रक्रिया काय आहे, ‘अनकलेक्तेबल’ आणि ‘फायनल डिलिशियन’ या संज्ञेमध्ये नेमका फरक काय आहे, याचे स्पष्टीकरण आयोगाने द्यावे. प्रत्येक पात्र मतदाराचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्याची जबाबदारी आयोगाची असल्याचे ते म्हणाले. नागरिकांनी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, याची तातडीने खात्री करून घ्यावी आणि नाव नसल्यास आक्षेप नोंदवावा, असे आवाहनही वडेट्टीवार यांनी केले. मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातील कंत्राटाच्या मुद्द्यावर बोलताना वडेट्टीवार यांनी आपल्याकडे पुरावे असल्याचे दावा केला.
संबंधित काम सिंचन विभागाचे असून त्याचे फोटो आणि अन्य पुरावे आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. या कामाचे कंट्रार रद्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आला होता. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात गोंधळ निर्माण झाला असून त्याचा परिणाम आंदोलनाच्या तीव्रतेवर झाला असावा, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाले असताना सरकार केवळ ‘करू, नंतर करू’ म्हणत वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. विरोधक म्हणून शेतकऱ्यांना मदत मिळवून देणे ही आपली जबाबदारी आहे, गणपती विसर्जननंतर मराठवाडा, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात मोर्चाची तयारी केली जाणार असून जिल्हानिहाय कार्यकर्त्यांकडून आंदोलनाची मागणी होत असल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार यांनी मुख्यमंत्री यांना शेतीच्या प्रश्नावर पत्र लिहिले आहे. त्यांना शेतीचा मोठा अनुभव आणि अभ्यास असल्याने सरकारने त्यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घ्यावी, असेही वडेट्टीवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या जाहिरातीवर टीका करताना वडेट्टीवार म्हणाले की, सध्या मोदींच्या जवळ कोण, याची स्पर्धाच सुरू झाली आहे. महाविद्यालयांमध्ये ‘महाराष्ट्रात मोदींच्या जवळचा नेता कोण?’ या विषयावर निबंध स्पर्धा घेतली तर त्याचे उत्तर मिळेल, असा टोला त्यांनी लगावला. मोदींच्या वाढदिवसाला जनतेचा प्रतिसाद काय होता आणि त्यावर कोणते मिम्स तयार झाले, हे जनतेने पाहिले आहे. बिहारमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, आत्महत्या आणि विद्यार्थ्यांचे पेपरफुटीविरोधातील आंदोलन सुरू असताना वाढदिवसाचा जल्लोष जनतेला पटलेला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.














