लोकवाहिनी न्यूज
मुंबई : जागतिक चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ९९व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताकडून ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची अधिकृत प्रविष्टी म्हणून निवड झाली आहे. ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’ने (एफएफआय) शुक्रवारी, १८ सप्टेंबर रोजी मुंबईत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ही ऐतिहासिक घोषणा केली. देशातील ३० हून अधिक मातब्बर चित्रपटांना मागे टाकत दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या पहिल्याच चित्रपटाने हा बहुमान पटकावला आहे.
काय आहे चित्रपटाची कथा?
महाराष्ट्राच्या पारंपरिक ‘गोंधळ’ या लोककलेवर आणि धार्मिक विधिवर हा चित्रपट आधारित आहे. नवविवाहित दांपत्याच्या आयुष्यातील विघ्न दूर करण्यासाठी केला जाणाऱ्या हा विधी केवळ धार्मिक घटकांपुरता मर्यादित न ठेवता, त्याद्वारे मानवी भावना, सामाजिक दृष्टिकोन आणि अंधश्रद्धा यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी आणि तांत्रिक भव्यतेच्या জোरावर हा चित्रपट मराठी संस्कृतीचे मूळ जागतिक व्यासपीठावर मांडतो.
बड्या चित्रपटांशी तगडी स्पर्धा
ऑस्करच्या या शर्यतीत देशातून विविध भाषांमधील अनेक दर्जेदार चित्रपट सामील होते. यात ‘डोरोथी’, ‘बायसन’, ‘अंग’, ‘धुरंधर-१’, ‘धुरंधर-२’, ‘इक्कीस’, ‘बॉर्डर २’, ‘देूळबंद २’ आणि ‘हनुमान अंश’ यासारख्या मोठ्या कलाकारांच्या व व्यावसायिक ताकद असलेल्या चित्रपटांचा समावेश होता. मात्र, महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे प्रभावी सिनेमॅटिक दर्शन घडवणाऱ्या ‘गोंधळ’ चित्रपटाने या सर्व तगड्या स्पर्धाकांना मागे टाकत बाजी मारली.
चित्रपटातील कलाकार व निर्मिती
या चित्रपटाचे लेखन, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन संतोष डावखर यांनी केले असून दीक्षा डावखर या चित्रपटाच्या सहनिर्मात्या आहेत. नोव्हेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा पहिला प्रिमियर गोव्यात ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये झाला होता, जिथे त्याला विशेष ज्युरी पुरस्काराचा ‘सिल्व्हर पीकॉक’ मिळाला होता. चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभु, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलास वाघमारे, प्रभाकर मळपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील आणि ध्रुव ठोके यांसारख्या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.













