पाककला व सांस्कृतिक आदानप्रदानासाठी आमंत्रण
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : भारतीय पाककला संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी उल्लेखनीय योगदान देणारे नागपूरचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांना इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने विशेष आमंत्रित केले आहे.
नोव्हेंबर महिन्यात तेल अजीव येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘क्युरेटेड कलिनीड अँड कल्चरल एंगेजमेंट’ या पाककला व सांस्कृतिक आदानप्रदानविषयक विशेष परिसंवादात ते भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या प्रतिष्ठित कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या भारतातील केवळ दोन शेफमध्ये त्यांचा समावेश आहे. ही बाब भारतीय पाककला क्षेत्रासाठी गौरваस्पद आहे.
तेल अजीव येथे होणाऱ्या आगामी परिसंवादाच्या माध्यमातून भारतीय खाद्यसंस्कृती, पारंपरिक पाककला आणि तिच्याशी निगडित सांस्कृतिक वारसा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याची संधी त्यांना मिळणार आहे. भारतीय पाककलेची समृद्ध परंपरा जागतिक समुदायापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने त्यांची ही निवड महत्वपूर्ण मानली जात आहे. गेल्या चार दशकांपासून पाककला क्षेत्रात कार्यरत असलेले शेफ विष्णू मनोहर यांनी आपल्या प्रतिभेच्या आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर जागतिक स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांनी आतापर्यंत ५५ पुस्तके लिहिली असून, ५,००० हून अधिक पाककला कार्यक्रम सादर केले आहेत. पारंपरिक भारतीय खाद्यसंस्कृतीचा इतिहास, तिचे वैविध्य आणि सांस्कृतिक महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे. पाककलतील त्यांच्या अनोख्या प्रयोगांची आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांच्या नावावर ३५ जागतिक विक्रम नोंदवले गेले आहेत.
अनेक नामवंत आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांसाठी खास पाककला अनुभव साकारण्याचा अनुभव शेफ विष्णू मनोहर यांना आहे. भारतासह अमेरिकेतही त्यांची ब्रँडेड रेस्टॉरंट्स आहेत. त्यांच्या पाककलतील प्रयोगशीलता, भारतीय खाद्यपरंपरेविषयीची बांधिलकी आणि सामाजिक योगदानाची दखल भारतासह अमेरिकेतील माध्यमांनीही घेतली आहे.
पत्रकार परिषदेला विष्णू मनोहर यांनी संबोधित केले, यावेळी सचिन जहागीरदार, विजय जथे, मिलिंद देशकर, प्रवीण मनोहर, प्रफुल्ल मनोहर यांची उपस्थिती होती














