फेसबुक पोस्टमधून मुख्यमंत्र्यांना सवाल
लोकवाहिनी न्यूज
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण সেনेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘फ्रेंडशिप फाइल’ या नावाने चर्चेत असलेल्या कथित ऑडियो क्लिपवरून राज्य सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. या क्लिपमध्ये पैशांच्या व्यवहारापासून ते माध्यमांवर दबाव आणणे आणि धार्मिक मुद्यांच्या माध्यमातून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यापर्यंतच्या कथित चर्चेचा उल्लेख असल्याचा दावा केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या क्लिपची सत्यता तपासण्यासाठी ती फोरेंसिक लैबकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, केवळ फोरेंसिक तपासणीचा मुद्दा पुढे करून सरकारने वेळ मारून नेऊ नये, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ‘हा लोकशाहीवरचा बलात्कार आहे,’ अशा शब्दांत त्यांनी या प्रकरणवरून सरकारला लक्ष्य केले आहे.
काय आहे ‘फ्रेंडशिप फाइल’ प्रकरण?
सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ‘फ्रेंडशिप फाइल’ नावाची कथित ऑडियो क्लिप चर्चेत आहे. ही क्लिप सुमारे २९ मिनिटांची असल्याचे सांगितले जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी या ऑडियो क्लिपचा उल्लेख केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या क्लिपमध्ये भाजपचे काही पदाधिकारी, पक्षाच्या सोशल मीडिया व्यवस्थेशी संबंधित व्यक्ती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ पदाधिकारी आणि काही राजकीय विश्लेषक असल्याचा दावा केला जात आहे. या संभाषणात ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराचा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या क्लिपमधील संभाषणाची सत्यता अद्याप अधिकृतपणे सिद्ध झालेली नाही.
राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. भाजपकडून सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. एखादा मुद्दा सरकारच्या अडचणी वाढवणारा ठरला, तर त्यावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा पुढे आणण्याबाबत या कथित क्लिपमध्ये चर्चा असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. स्वतःला निष्पक्ष राजकीय विश्लेषक म्हणवणाऱ्या काही यूट्यूबरवरील व्यक्तीवरही त्यांनी टीका केली. त्यांच्या मते, या प्रकरणात केवळ ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराची चर्चा होऊन चालणार नाही. सोशल मीडिया आणि माध्यमांवर दबाव आणण्याच्या कथित प्रयत्नांचीही सखोल चौकशी झाली पाहिजे.
फोरेंसिक तपासणीवरून मुख्यमंत्र्यांना सवाल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही ऑडियो क्लिप फोरेंसिक लैबकडे तपासणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे, या निर्णयावर राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ऑडियो किंवा व्हिडिओ क्लिपची सत्यता तपासण्यासाठी फोरेंसिक तपासणी केली जाते. मात्र, या प्रकरणात केवळ तांत्रिक तपासणी करून सरकारने आपली जबाबदारी संपवू नये, असे त्यांनी म्हटले आहे. क्लिपमध्ये केलेले दावे गंभीर असतील, तर त्यांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
क्लिप आत्ताच का बाहेर आली?
ही क्लिप दोन वर्षांपूर्वीची असण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचा उल्लेख करत राज ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ही क्लिप नेमकी बाहेर कशी आली आणि ती कोने समोर आणली, याचाही शोध घेतला पाहिजे, असे ते म्हणाले. राज्य सरकारमधील राजकीय हालचालींवर टीका करत त्यांनी या प्रकरणात राजकीय दावपेच असल्याचा आरोप केला. फोरेंसिक अहवालाच्या तांत्रिक बाबीमध्ये जनतेला गुंफून ठेवू नका. या प्रकरणात जे आरोप झाले आहेत, त्याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.













