मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे लवकरच ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात त्यांनी एका महत्त्वपूर्ण राजकीय नेत्याची भूमिका साकारली आहे. नुकताच त्यांच्या व्यक्तिरेखेचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला असून, त्यातील त्यांचा करारी अंदाज चर्चेचा विषय ठरत आहे. हा चित्रपट २० नोव्हेंबर २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ हा राजकारण, गुन्हेगारी आणि सत्तेच्या गैरलावापरावर आधारित थरारपट आहे. राजकीय व्यवस्थेतील गैरप्रकार, गुन्हेगारीचे जाळे आणि सत्य समोर आणण्यासाठी केला जाणारा संघर्ष यांची कथा या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. सत्तेच्या जोरावर गुन्हे लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती आणि यांच्याविरोधात कारवाई करणारे यंत्रणा यांच्यातील संघर्ष या यात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूकध्ये सुबोध भावे पांढऱ्या कुर्त्यावर काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केलेल्या रुबाबदार रुपात दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील गंभीर भाव आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तित्व लक्ष वेधून घेत आहे. चित्रपटातील त्यांच्या व्यक्तिरेखेचा एक संवादही समोर आला आहे. ‘मंत्री असो की आमदार असो… जो कोणी दोषी असेल, त्याला कायद्याच्या चौकटीत घ्यावाच लागेल. त्याची गय केली जाणार नाही,’ असे ते म्हणताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
या चित्रपटात सुबोध भावे यांच्यासोबत दीपाली सय्यद, उदय टिकेकर आणि अक्षय टंकसाळे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. स्वरूप सावंत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे, संजय नवगिरे यांनी कथा, पटकथा आणि संवाद लिहिले असून, चित्रपटाची संकल्पना सागरकुमार एस. जैन यांची आहे. आनंदी पिक्चर्स अमरावती आणि सचिन रोडे पाटील प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्डच्या बॅनरखाली देवेंद्र भट, सूर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे यांनी केली आहे.










