विद्यार्थ्यांना देणार आधुनिक तंत्रज्ञानाचे व्यावहारिक ज्ञान
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : महाराष्ट्राला आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर नेण्याच्या दिशेने प्रयत्नशील असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) च्या माध्यमातून शिक्षणाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. पूज्यनीय गोळवलकर गुरुजी एआय पब्लिक स्कूल अँड जूनियर कॉलेजमध्ये राज्यातील पहिली AI टीचर ‘वेदांती’ दाखल झाली असून, तिच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे व्यावहारिक ज्ञान मिळणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती आणि नवोपक्रमशीलता विकसित करण्याच्या उद्देशाने अभ्यंकरनगर येथील या शाळेत एआय रोबोटिक्स लॅबची स्थापना करण्यात आली आहे. या लॅबचे उद्घाटन शुक्रवार करण्यात आले.
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल दहिफळे उपस्थित होते. यावेळी सुनील खानखोझे, शुभांगी फुटाणे, ललित तपासे, मोहन साठे, गुणवंत अभ्यंकर, भारतीय विद्या प्रसारक संस्थेचे रमेश बक्षी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. वंदना बडबाइंके यांची मंचावर उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते फीत कापून एआय रोबोटिक्स लॅबचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी लॅबची पाहणी करून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध प्रयोगांचे कौतुक केले. या लैबमधील एआय शिक्षिका ‘वेदांती’ नेमान्यवरांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना अचूक उत्तरे देत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष प्रयोग, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कौशल्यधारित शिक्षण देणे हा लॅबचा मुख्य उद्देश असल्याचे डॉ. वंदना बडबाइंके यांनी प्रास्ताविकातून सांगितले. ही केवळ नागपुरातील नव्हे, तर संपूर्ण विदर्भातील पहिली एआय आधारित लॅब असल्याचे नमूद करून अनिल दहिफळे म्हणाले की, नागपुरातील विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. विद्यार्थ्यांनी नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात आणणे, समस्यांवर नवीन्यपूर्ण उपाय शोधणे आणि भविष्यातील तंत्रज्ञानाच आहवानासाठी स्वतःला सज्ज करणे ही काळाची गरज आहे.
अध्यक्षीय भाषणेत रमेश बक्षी यांनी एआय या संक्षिप्त शब्दाचा अर्थ केवल ‘आर्टिफिशियल इंटेलिजेंस’ नसून ‘ऑलटाइम इंटेलिजेंस’ असाही असल्याचे सांगितले. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी बुद्धिमान व्हावा, या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. पादुरंग खानखोझे यांच्या प्रतिमेला माल्यर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तयार केलेली परसबाग, गणितीय बाग, दिवाळीनिमित्त बनविलेले आकाशकंदील आणि शुभेच्छापत्रांचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले. एआय रोबोटिक्स लॅबच्या निर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या डॉ. वंदना बडबाइंके, यश आणि स्नेहल यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अश्विनी देशमुख यांनी केले.













