नागपूर : चिमूरमधील शेडगाव सफारी क्षेत्रातून वन्यजीवप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. येथे छोटा मटका वाघाची ब्लडलाइन सातत्याने पुढे जात आहे. नुकतेच रविवारी सकाळच्या सफारीदरम्यान तीन बछडे एकाच वेळी दिसून आले. हे तिन्ही बछडे जान्हवी आणि कलवा या वाघांचे असल्याचे सांगितले जात आहे.
हा सुंदर क्षण नागपूरचे वन्यजीव छायाचित्रकार समीर इंदपवार यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपला. एकाच वेळी ३ बछडे दिसल्याने सफारीसाठी आलेल्या पर्यटकांमध्ये तसेच वन्यजीवप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
शेडगाव सफारी क्षेत्रात वाघांची वाढती संख्या आणि नवीन पिढीची उपस्थिती ही वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने सकारात्मक बाब मानली जात आहे. छोटा मटका वाघाची ब्लडलाइन पुढे जात असल्याने या परिसरातील वाघांचा वंशविस्तार होत असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.


















