लोकवाहिनी न्यूज,नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात अधीक्षक अभियंता (स्थापत्य) संवर्गातील अधिकारी अजय दाभाडे यांना मुख्य अभियंता (स्थापत्य) पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नतीनंतर त्यांची नियुक्ती राज्यातील महत्त्वाकांक्षी आणि राष्ट्रीय स्तरावरील गोसीखुर्द प्रकल्पावर मुख्य अभियंता म्हणून करण्यात आली आहे.
अजय दाभाडे यापूर्वी नांदेड पाटबंधारे मंडळ, नांदेड येथे अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत होते. विविध मोठ्या सिंचन प्रकल्पांवर काम करण्याचा त्यांना व्यापक अनुभव असून, त्यांच्या नियुक्तीमुळे गोसीखुर्द प्रकल्पाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
राज्य सरकारने गोसीखुर्द प्रकल्प २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, सध्याची कामांची गती, अपूर्ण राहिलेली कामे आणि प्रशासकीय अडचणी लक्षात घेता निर्धारित मुदतीत प्रकल्प पूर्ण होण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे मोठे आव्हान दाभाडे यांच्यासमोर असणार आहे. विदर्भातील महत्त्वाच्या या प्रकल्पाकडे शेतकऱ्यांच्या अपेक्षेने पाहिले जात असून, सिंचन क्षमतेत वाढ करून शेतीला स्थैर्य देण्याची मोठी जबाबदारी या प्रकल्पावर आहे. दाभाडे यांच्या अनुभवाचा लाभ घेऊन प्रकल्पाला अपेक्षित गती मिळेल आणि शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्णत्वास जाईल, अशी आशा व्यक्त होत आहे.







