चार दशकात शैक्षणिक संघटनांचे वर्चस्व : इतिहासाची पुनरावृत्ती की परिवर्तन?
लोकवाहिनी न्यूज
अकोला : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी आतापर्यंत अनेक वेळा जोरदार मोर्चेबांधणी केली. मात्र, अधिकृत राजकीय पक्षाच्या उमेदवारांच्या पदरी कायम निराशा पडली. चार दशकाहून अधिक काळापासून अपवाद वगळता शैक्षणिक संघटनांचे वर्चस्व राहिले आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ आणि म.रा.शिक्षक परिषदेने तब्बल तीन दशकं दबदबा राखला. गत दोन निवडणुकांमध्ये अपक्ष्यांच्या परड्यात शिक्षकांनी कौल टाकला. आता पुन्हा एकदा राजकीय पक्षांसह शैक्षणिक संघटनांमध्ये चुरशीची लढत होत आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होणार की परिवर्तन घडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांसह विविध शिक्षक संघटनांचे उमेदवार मैदानात आहेत. हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी राजकीय पक्षांनी संघटनात्मक बांधणी करून तयारीवर भर दिला. या मतदारसंघावर शैक्षणिक संघटनांचा ताबा होता. आता शिक्षक मतदारसंघातही राजकीय पक्षांनी शिरकाव केला. पूर्वी शैक्षणिक संघटनांची म्हणून ओळखली जाणारी ही निवडणूक आता राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरते. दुसरीकडे विविध शिक्षक व शैक्षणिक संघटनाुपुढे देखील अस्तित्त्वाचा मोठा प्रश्न आहे. शिक्षक मतदारसंघाचा इतिहास बघितल्यास ८० च्या दशकापूर्वी अमरावती आणि नागपूर एकत्रित शिक्षक मतदारसंघ होता. १९६३-६४ मध्ये अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने बाबासाहेब सोमवंशी यांना संधी मिळाली. त्यानंतर १९९० मध्ये झालेल्या निवडणुकीत म.रा.शिक्षक परिषदेचे वसंतराव मालधुरे निवडून आले. १९९६ मध्ये शिक्षक परिषदेने जागा कायम राखली. दिवाकर पांडे यांनी विजय मिळवला. २००२ मध्ये वि.मा.शि.चे वसंतराव खोटरे यांनी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जिंकत पुन्हा एकदा संघटनेचे वर्चस्व प्रस्थापित केले. त्यानंतर २००८ मध्ये पुन्हा एकदा वसंतराव खोटरेंनी विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा आमदार होण्याचा इतिहास घडवला. २०१४ च्या निवडणुकीत राजकीय पक्षांचा शिरकाव, मतांची फाटाफूट झाल्याने वसंतराव खोटरे यांचा पराभव करून अपक्ष श्रीकांत देशपांडे यांनी शिक्षकांची आमदारकी मिळवली. २०२० च्या निवडणुकीत श्रीकांत देशपांडे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे गेले. त्यांना अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. अमरावती शिक्षक मतदारसंघाचे स्रब्बाचार दशकाच्या इतिहासात १८ वर्षे वि.मा.शि., १२ वर्ष शिक्षक परिषद व १२ वर्षे अपक्षांनी प्रतिनिधित्व केले. राजकीय पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे गेलेल्या कुणालाही अद्यापपर्यंत शिक्षकांनी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली नाही. आता या निवडणुकीत नेमके काय घडणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शिक्षकांचे प्रश्न, समस्या शासन दरबारी मांडून ते सोडवण्यासाठी शिक्षक मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यामुळे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिक्षकांनी करणे अपेक्षित असते. राजकीय पक्षांची चढाओढ सुरू असली तरी शैक्षणिक संघटनांसाठी हा मतदारसंघ अत्यंत महत्वपूर्ण आहे. असे शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार वसंतराव खोटरे यांनी सांगितले.














