पंढरपूरमध्ये बच्चू कडूंचे वक्तव्य
लोकवाहिनी न्यूज:पंढरपूर : महाराष्ट्रात आज जरी कोणी सर्व्हे केला, तरी एकनाथ शिंदे यांचेच नाव मुख्यमंत्रीपदासाठी समोर येईल. कायम सर्वसामान्य जनतेशी असलेल्या त्यांच्या बांधिलकीमुळे मलाच नाही, तर अवघ्या महाराष्ट्राला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे असे वाटत आहे. यासाठी देवाला कशाला साकडे घालू, आता आम्ही थेट जनतेला साकडे घालू, असे वक्तव्य शिवसेनेचे विधान परिषद सदस्य बच्चू कडू यांनी केले.
पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी आलेले असताना बच्चू कडू यांनी पत्रकारांशी बोलताना शेतकऱ्यांसाठी विभागवार धोरण ठरविणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि आर्थिक घडामोडींवर आपली स्पष्ट भूमिका मांडली. विशेषतः शेतकरी संघटना आणि त्यांच्या आंदोलनासंदर्भात त्यांनी जोरदार वक्तव्य केले. ते म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली १५ मे रोजी मुंबईत काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एल्गार करण्यात आला होता. या आंदोलनात विरोधकांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या समर्थनात मोर्चा काढला, मात्र मुंबई पोलिसांनी मोर्चाला परवानगी न मिळाल्यामुळे मोर्चेकऱ्यांना जबरदस्तीने गाडीत कोंबले. राजू शेट्टी यांना तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महादेव जानकर आणि मराठी भाषा केंद्राचे दीपक पवार यांनाही ताब्यात घेण्यात आले. या घटनेविषयी विचारले असता, बच्चू कडू यांनी या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. तसेच आंदोलनकारांच्या बाजूने उभे राहण्याचे ते म्हणाले.
त्याचप्रमाणे, मराठा आंदोलनाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारविरोधात पुन्हा एल्गार केले आहे. आपल्या मागण्यांवर सरकारकडून ठोस अंमलबजावणी न झाल्याचा आरोप करत त्यांनी ३० मे पासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. यावर बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले, आता आपण कोणत्याही जातीच्या आंदोलनात सहभागी होणार नाही. शेतकरी आणि दिव्यांग यांसारख्या व्यापक समस्या सर्व जातींमध्ये आहेत. त्यामुळे एका विशिष्ट गटाच्या मुद्द्यात अडकण्याऐवजी आपण सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवणार आहोत.
त्यांच्या या विधानानंतर भाजपकडून पहिला पलटवार करण्यात आला. भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी बच्चू कडू यांना ‘नौटंकीबाज’ म्हणत त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ज्यांना स्वतःच्या मतदारसंघाची नस ओळखता आली नाही, त्या नौटंकी छाप बच्चू कडू यांना महाराष्ट्र कधीपासून कळायला लागला? आता नोकरी दिली आहे, तर मालकाचे गुणगान करणे त्यांना अनिवार्य आहे. ज्यांना स्वतःच्या मतदारसंघाने नाकारले त्यांनी आधी स्वतःचा किल्ला सांभाळावा, मग महाराष्ट्राबद्दल बोलावे. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता लोंढे पोरही सांगेल, पण तुमची नोकरी ती लोकप्रियता तुम्हाला दिसू देणार नाही, अशी टीका शिवराय कुलकर्णी यांनी केली.










