लोकवाहिनी न्यूज:मुंबई : आंदोलन करणाऱ्यांना सत्तेबाहेर ठेवण्याची परंपरा मोडीत काढत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी केली असून बच्चू कडू यांना शिवसेनेत प्रवेश दिला आहे. सोबतच त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन, ‘रस्त्यावरचा आवाज थेट निर्णयप्रक्रियेत’ आणण्याचा नवा राजकीय प्रयोग केला आहे.
या घडामोडीसोबतच शिवसेनेने विधान परिषद निवडणुकीसाठी दोन नावे जाहीर करत राजकीय समीकरणांना वेग दिला. बच्चू कडू यांच्यासह माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी देण्याची घोषणा स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीला अवघे दोन तास शिल्लक असताना घेतलेल्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली. शेवटच्या क्षणापर्यंत दुसऱ्या उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम ठेवत शिंदेंनी आपल्या निर्णयक्षमतेचा ठसा उमटवला.
मुंबईत झालेल्या कार्यक्रमात बच्चू कडूंनी शिवसेनेत प्रवेश करत आपली भूमिका स्पष्ट केली. प्रहार संघटना पुढेही स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून कार्यरत राहणार असली तरी राजकीय लढा शिवसेनेच्या माध्यमातून उभारला जाईल, असे त्यांनी जाहीर केले. शेतकरी, दिव्यांग, कष्टकरी, दलित, शोषित आणि गोरगरीबांच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वाटचाल पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना सचिव संजय मोरे, आमदार मुरजी पटेल, शिवसेना आणि प्रहार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बच्चू कडू यांचे नेतृत्व आंदोलनातून उभे राहिलेले आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी काढलेले मोर्चे, दिव्यांगांसाठी उभारलेले आंदोलन, तसेच गोरगरीब, शोषित आणि पीडित घटकांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरून लढा देत त्यांनी स्वतःची वेगळी छाप निर्माण केली, असे शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे सरकारला कर्जमाफीसारखे महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागले, याची आठवणीही एकनाथ शिंदे यांनी करून दिली.
यावेळी बोलताना शिंदेंनी बच्चू कडूंच्या लढाऊ स्वभावाचे कौतुक करत अन्यायाविरुद्ध लढा हा बाळासाहेबांच्या विचारांचा गाभा असल्याचे सांगितले. ‘आपले आणि बच्चू कडू यांचे विचार एकच सर्वसामान्यांना न्याय देणे,’ असे स्पष्ट करत त्यांनी सामाजिक लढ्याला राजकीय ताकदीची जोड देण्याची गरज अधोरेखित केली. ‘मी एकदा शब्द दिला की तो पाळतो,’ असे ठामपणे सांगत त्यांनी आपल्या नेतृत्वशैलीवर शिक्कामोर्तब केले. बच्चू कडूंनीही हा प्रवेश केवळ उमेदवारीसाठी नसून विचारांच्या एकतेसाठी असल्याचे स्पष्ट केले.
माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अनुभवालाही या निर्णयात महत्त्व देण्यात आले आहे. विधान परिषदेत केलेले त्यांचे काम, महिलांच्या प्रश्नांवर घेतलेली आक्रमक भूमिका आणि संघटनात्मक योगदान लक्षात घेता त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे एका बाजूला आंदोलनातून आलेले नेतृत्व आणि दुसऱ्या बाजूला अनुभवी नेतृत्व असे संतुलन साधण्याचा प्रयत्न दिसून येतो.








