मराठी चित्रपटसृष्टीत नवीन प्रयोगांची झलक दाखवणारा ‘घबाड-कुंड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये भरपूर रहस्य, थरार आणि अनपेक्षित घडामोडी दाखवल्या आहेत, जे प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतील, असे निर्माते डॉ. रसिक कदम यांनी सांगितले.
निर्माते डॉ. रसिक कदम यांनी सांगितले की, या चित्रपटात असलेली धक्कादायक वळणे आणि रहस्य प्रेक्षकांसाठी एक मोठे सरप्राइज ठरणार आहे. ‘घबाड-कुंड’मध्ये प्रेक्षकांना कल्पनेच्या पलीकडचे एक वेगळे विश्व पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रीतम एस.के. पाटील यांनी केले असून, डॉ. रसिक कदम यांची निर्मिती साथ या प्रकल्पाला मिळाली आहे. हा चित्रपट आयकॉन डी स्टाईल प्रस्तुत असून, मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स म्हणून पाहायला मिळणार आहे. चित्रपट १९ जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा रहस्यमय आणि गूढ गोष्टींभोवती फिरते. ६ पात्रे एका धोकादायक प्रवासाला निघतात, जिथे त्यांना भीती, थरार आणि अनपेक्षित घटना अनुभवाव्या लागतात. हा प्रवास प्रेक्षकांना त्या अंधाऱ्या आणि गूढ जगात घेऊन जातो. चित्रपटातून घबाडकुंडमधील रहस्य काय आहे आणि त्या गूढतेमागचे सत्य काय आहे, हे उलगडण्याचा अनुभव मिळणार आहे.
या चित्रपटात शशांक शेंडे, संदीप पाठक, देवदत्त नागे, कुशल बद्रिके, प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, योगेश प्रकाश तनपुरे, साहिल अनलदेवर यांसारख्या कलाकारांची दमदार फौज दिसणार आहे. निर्माते आणि कलाकारांचा असा विश्वास आहे की, घबाडकुंड प्रेक्षकांना एक अनोखा सिनेमॅटिक अनुभव देईल. रहस्य, भय, थरार आणि अनोख्या घटनांचा संगम प्रेक्षकांना एका वेगळ्या विश्वात घेऊन जाईल. १९ जूनपासून प्रेक्षकांनी मोठ्या पडद्यावर हा चित्रपट नक्की बघावा.










