गाण्यासाठी मिळाले होते फक्त ३ हजारांचे मानधन
लोकवाहिनी न्यूज,नागपूर : १९९० च्या दशकात एका गाण्याने प्रेक्षकांना वेड लावलेले. ते गाण होते, ‘तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे’. अल्ताफ राजा यांच्या आवाजातील हे गाणे ९० च्या दशकात अनेकांच्या ओठांवर होते. त्यावेळच्या तरुण पिढीने हे गाणे डोक्यावर घेतले होते. प्रियकर-प्रेयसीच्या भावनांवर हे गाणे होते. या गाण्याची त्या काळात प्रचंड क्रेझ होती. या गाण्याचे गीतकार जहीर आलम यांचे आज निधन झाले. ते नागपुरात वास्तव्याला होते.
जहीर आलम नागपूरच्या मोमीनपुरा या वस्तीतील एका छोट्याशा घरात वास्तव्यास होते. त्यांचे जीवन संघर्षात आणि आर्थिक विवंचनेत गेले. गेल्या काही वर्षांपासून ते नागपूरकरांच्या विस्मरणात गेले होते. ‘तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे’ हे गीत सुरुवातीला स्थानिक स्तरावर गायले जात होते. त्यानंतर त्याला अल्ताफ राजा यांनी गायल्यानंतर हे गीत अजरामर झाले. त्यांच्या या सदाबहार गाण्याने अनेकांचा फायदा झाला. मात्र, त्यांची झोळी रिकामीच राहिली.
‘तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे’ या गाण्यावर अल्बम काढणाऱ्या कंपनीने, गायकाने भरपूर पैसा कमावला. पण या गाण्याचे गीतकार जहीर आलम यांच्या वाट्याला मात्र कष्टच आले. खरंतर या गाण्याने त्यांच्या आयुष्यातील आर्थिक विवंचना संपायला हव्या होत्या. पण तसे घडले नाही. हे गीत त्यांनी बनवले, पण त्यांच्या वाट्याला उपेक्षा, कष्ट आले. ते एम्प्रेस मिलमध्ये नोकरीला होते. पण ही मिल नंतर बंद पडली. त्यानंतर त्यांच्या आयुष्यातील कष्टप्रद प्रवास सुरु झाला.
आधी कव्वाली म्हणून हे गाणे गायले जायचे. पण अल्ताफ राजा यांनी म्युझिक अल्बममध्ये हे गाणे गायल्यानंतर रातोरात हिट झाले. चहाची टपरी, रिक्षा इथे हे गाणे वाजू लागले. गीतकार म्हणून त्यांना मात्र अल्प मानधन मिळाले.
गीतकार जहीर आलम यांनी एका चित्रपटासाठी लिहिलेले गाणे खूप गाजले, पण चित्रपटातील इतर गाणी दुसऱ्या नामवंत गीतकाराची होती. त्याने गीतकार म्हणून फक्त माझेच नाव जाईल अशी अट घातलेली. त्यामुळे जहीर आलम यांचे नाव समोर आले नाही. त्यांना फक्त ३ हजार रुपये मानधनावर समाधान मानावे लागले.








