३७४० ढोल-ताशा वादकांसह ८०० कलाकारांच्या विविध कला
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : गणेशोत्सवाच्या माध्यमातून कला, संस्कृती आणि परंपरांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित सांस्कृतिक गणेशोत्सवाला यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील तब्बल ५५० गणेश मंडळांनी या उपक्रमात सहभाग घेतला. त्यात ५४ ढोल-ताशा पथकांमधील तब्बल ३७४० वादकांनी पारंपरिक वादन सादर करत गणेशोत्सवाचा उत्साह द्विगुणीत केला. शिवाय सुमारे ८०० कलाकारांनी विविध कला सादर करून नागपूरकरांचे मनोरंजन केले.
गणेश मंडळांच्या मागणीला प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून यंदा ढोल-ताशा पथकांसाठी विशेष नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्याला पथकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक ढोल-ताशा वादनामुळे गणेशोत्सवाच्या मिरवणुका आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे, कला-साहित्य-संस्कृती आणि परंपरांचे जतन व संवर्धन व्हावे, तसेच गणेश मंडळांनी केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमही राबवावेत, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समिती, नागपूरचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, डॉ. दीपक खिरवडकर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्त, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष बांदिले, भोलानाथ सहारे, ॲड. नितीन तेलगोटे, मनीषा काशीकर, विजय फडणवीस, महेंद्र राऊत, दिलीप गौर, शैलेश डोळके, संजय बंगाले, किसन गावंडे, योगेश बन आणि राजू कनाटे यांनी सहकार्य केले.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
यंदाच्या महोत्सवात भक्तिसंगीत, सुगम संगीत, देशभक्तीपर गीते, हास्य कवीसंमेलन, जागरण, गोंधळ, कीर्तन, लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, एकपात्री प्रयोग, नाट्यप्रयोग, नकला, गीत रामायण, जादूचे प्रयोग, रांगोळी व मेहंदी प्रशिक्षण वर्ग, कथाकथन आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून ८०० कलाकारांनी आपली कला सादर केली. खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने स्थानिक गणेश मंडळे, ढोल-ताशा पथके, वादक आणि कलाकार यांना यानिमित्ताने व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यामुळे यंदाचा सांस्कृतिक गणेशोत्सव हा नागपूरच्या सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन घडविणारा ठरला.












