स्वतंत्र गट स्थापण्याच्या तयारीत
लोकवाहिनी न्यूज
मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या खासदारांच्या बंडानंतर देशभरात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे पश्चिम बंगालनंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणाकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरेंचे काही खासदार शिंदेसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यात उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीला खासदारांनी लावलेली गैरहजेरी या चर्चांना अधिक बळ देणारी ठरली. आता यापुढे उद्धवसेनेचे काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली करत असल्याची बातमी समोर आली आहे. हे खासदार लोकसभा अध्यक्षांना पत्र देणार असल्याची चर्चा आहे. दिल्लीतील या घडामोडींवर संजय राऊत यांनीही भाष्य केले आहे.
तृणमूल काँग्रेसच्या खासदारांप्रमाणे ठाकरेंचे काही खासदार वेगळा गट बनवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. ठाकरेंचे यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख दिल्लीत मंत्री प्रतापराव जाधवांना भेटले, त्यामुळे चर्चांना जोर आला. रविवारी उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला ९ पैकी केवळ ४ खासदार उपस्थित होते, तर उर्वरित ५ खासदार गैरहजर होते. भाऊसाहेब वाकचौरे, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख आणि आष्टीकर बैठकीला गैरहजर होते. या खासदारांनी गैरहजेरीची वेगवेगळी कारणे दिली आहेत.
याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, ज्यांना जायचं आहे, त्यांनी खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं. आजचा दिवस माझा नाही. पण उद्याचा दिवस नक्की माझा असेल. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जो सोडून जाईल, त्यांना एक दिवस नक्की पश्चात्ताप होईल, असे ठाकरे म्हणाले. तसेच कार्यकर्त्यांनी सहन करायला शिकावे, असे आवाहनही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले.
दरम्यान, खासदार संजय राऊत म्हणाले की, लोकसभेत शिवसेनेचा एकच गट आहे, जो अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. आता कळतंय, समजतंय या गोष्टी गेल्या २ वर्षांपासून मी ऐकतोय. आताच पत्र द्यायला गेलेत, हे देखील अनेक वर्ष आम्ही ऐकतोय. कालच्या बैठकीच्या अनुषंगाने बहुतांश खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात होते. आज सकाळपासून काही खासदारांशी आमचे बोलणे झाले. सकाळी संजय देशमुख आणि उद्धव ठाकरे यांचीही काही कामानिमित्त चर्चा झाली. आणखी २ खासदारांशी चर्चा झाली. याउपरही जर तुम्हाला वाटत असेल कुणी पत्र द्यायला गेले असतील तर त्या पत्राचा मसुदा आल्यावर त्यावर उत्तर देऊ असं त्यांनी म्हटलं.
त्या खासदारांची काय चूक? : मुनगंटीवार
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, …तर २०१९ ची पत्रकार परिषद आठवा, भाजप-शिवसेना युतीला जनतेने कौल दिला. भाजपाचे १०५ आणि सेनेचे ५६ आमदार आले. बहुमत आले असताना तुम्ही काँग्रेससोबत गेलात. जशी तुम्ही कृती करता तेच संस्कार योग्य आहेत असं खासदारांना वाटते. त्या खासदारांची काय चूक? ऑपरेशन टायगर सुरू झाले की नाही हे माहिती नाही. ईश्वराने जे काही निर्माण केलंय ते तुमच्या नशिबात येणार हे मान्य करायचे, असा टोला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धवसेनेला लगावला.









