लोकवाहिनी न्यूज
मुंबई : तर ते मला दिल्लीला पाठवतात. मला त्याचा आनंदच आहे, माझा पक्ष ठरवेल, माझे नेते ठरवतील, त्या दिवशी जरूर मी दिल्लीला जाईन, पण आज तरी माझे मत आहे, २०२९ पर्यंत मी दिल्लीला जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिल्लीच्या राजकारणात जाण्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, फडणवीस यांनी पुन्हा एकदा या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी दिल्लीला जाण्याच्या चर्चेवर भाष्य केले. ते म्हणाले की, काही हितचिंतकांना आपण दिल्लीला गेलो तर ते आपले ‘प्रमोशन’ असेल, असे वाटते. तर काहींना आपण दिल्लीला गेलो तर महाराष्ट्रातील राजकारणातील अडचण दूर होईल, असे वाटते. त्यामुळे वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्याला दिल्लीला पाठवण्याच्या बातम्या अधूनमधून सुरू होतात. फडणवीस म्हणाले की, दर दोन-तीन महिन्यांनी काहींना नवीन बातमी हवी असते. त्यामुळे आपल्याला दिल्लीला पाठवले जात असल्याच्या चर्चा सुरू होतात. मात्र, आपल्याला पक्षाचे राजकारण आणि पक्षाची भूमिका चांगली माहिती आहे. २०२९ पर्यंत माझे नेते मला महाराष्ट्रातच ठेवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माझा पक्ष आणि माझे नेते जो निर्णय घेतील, त्या दिवशी मी नक्की दिल्लीला जाईन. मात्र, आज माझे मत स्पष्ट आहे की, २०२९ पर्यंत मी दिल्लीला जाणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाबाबतही आपली भूमिका मांडली. महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या राज्याची अर्थव्यवस्था सुमारे ६६० अब्ज डॉलरवर पोहोचली असून, त्यामुळे महाराष्ट्र या लक्ष्याच्या जवळ असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या महाराष्ट्राचा विकासदर ८.८ टक्के आहे. मात्र, २०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्यासाठी विकासदर आणखी वाढवण्याची गरज आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्याला भविष्यात १० टक्क्यांहून अधिक विकासदर गाठण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. देशातील अनेक राज्ये १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न पाहत आहेत. मात्र, सध्या या लक्ष्याच्या सर्वाधिक जवळ महाराष्ट्र आहे. विकासाचा वेग कायम ठेवला आणि शाश्वत विकास साधला, तर २०३० पर्यंत महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनू शकतो, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
फडणवीस उपपंतप्रधान होणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच दिल्लीत बोलावून उपपंतप्रधानपदाची मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचा दावा, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नंतर फडणवीस यांना पुढे करण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका असल्याचा दावा त्यांनी केला. राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या मोदी मंत्रिमंडळात नसलेल्या आणि दिल्लीत सक्रिय नसलेल्या एका महत्त्वाच्या नेत्याला उपपंतप्रधान करण्याची तयारी सुरू आहे. या नेत्याला भविष्यात मोदींचा वारसदार म्हणून पुढे करण्याची संधानची भूमिका असल्याचे राऊत यांनी सांगितले. मात्र, राऊत यांच्या या दाव्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी फडणवीस यांनी पंतप्रधानपदाच्या चर्चेवर भाष्य करताना, ‘पीएम इन वेटिंग असलेले लोक कधीच पंतप्रधान होत नाहीत. सध्या देशात पंतप्रधानपदासाठी कोणतीही व्हॅक्सीन नाही,’ असे म्हटले होते. त्यामुळे फडणवीस यांच्या दिल्लीतील संभाव्य भूमिकेबाबत राऊत यांच्या दाल्यानंतर राजकीय चर्चांना पुन्हा वेग आला आहे.









