जागावाटपावर मविआची बैठक ; २ दिवसांत अंतिम निर्णय
लोकवाहिनी न्यूज:मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेच्या १६ जागा आणि नागपूरमधील एका पोटनिवडणुकीसह एकूण १७ जागा महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवणार असून, टिळक भवन येथे झालेल्या बैठकीत जागावाटपावर प्राथमिक चर्चा करण्यात आली. पुढील २ दिवसांत पुन्हा बैठक घेऊन सर्वसंमतीने अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
बैठकीनंतर, बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी माहिती दिली की, पुढील दोन दिवसांत पुन्हा एकदा बैठक घेऊन सर्व घटक पक्षांच्या संमतीने जागावाटपाचा अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. ही बैठक अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उबाठा) या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी यात सहभाग घेतला होता. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, तसेच शिवसेना (उबाठा) गटाचे नेते अंबादास दानवे, अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. सर्व पक्षांमध्ये जागावाटपावरून कोणताही तणाव किंवा मतभेद नसून पूर्ण समन्वय असल्याचा दावा सपकाळ यांनी केला.
दरम्यान, राज्यातील सत्ताधारी भाजपवर टीका करताना सपकाळ यांनी आरोप केला की, भाजपने निवडणूक प्रक्रियेत पैशाचा आणि दबावाचा वापर करून लोकशाही प्रक्रियेचे उल्लंघन केले आहे. पैसा फेक तमाशा देख, या पद्धतीने नगरसेवकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. अशा परिस्थितीत लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडी एकजुटीने निवडणूक लढवेल, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
याचबरोबर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरूनही त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी तीन तास रास्ता रोको केला होता. या आंदोलनामुळे सरकारवर दबाव निर्माण झाला असून, त्यामुळे तातडीने दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत कांदा प्रश्नावर बैठक घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.










