लोकवाहिनी न्यूज,नागपूर : घरात चहा बनवत असताना झालेल्या सिलेंडर स्फोटात पतीचा मृत्यू, तर पत्नी आणि मुले जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे घडली. रविवारी (१९ एप्रिल) सकाळी, कामठी परिसरातील गांधीनगर भाजी बाजार येथील एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या दुःखद घटनेत घरातील प्रमुख अतुल उर्फ बंटी दशरथ पानतावणे (४०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर बचावकार्यासाठी धावलेल्या कुटुंबीयांसह आणि शेजाऱ्यांसह एकूण १० जण जखमी झाले. या घटनेमुळे संपूर्ण कामठी परिसरात शोककळा पसरली आहे.
जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल आपल्या पत्नी आणि तीन मुलांसोबत आनंदाने राहत होते. सकाळी साधारण ८ वाजता, जेव्हा त्यांची पत्नी चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली, तेव्हा गॅस गळतीमुळे आग लागली. आग वेगाने पसरली आणि सिलेंडरपर्यंत पोहोचल्याने मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, त्यामुळे जवळच्या घरांच्या खिडक्या हादरून गेल्या.
गॅस सिलेंडरचा स्फोट होताच, काळा धूर आणि आगीच्या ज्वाळा संपूर्ण घरात पसरल्या. अतुलची पत्नी आणि तीन मुले जीव वाचवण्यासाठी तात्काळ बाहेर पडण्यात यशस्वी झाली. मात्र, त्यावेळी बेडरूममध्ये झोपलेले अतुल दाट धुरामुळे बाहेर पडू शकले नाहीत. आगीच्या ज्वाळांमध्ये गुदमरून अतुल यांचा वेदनादायक मृत्यू झाला. आग विझवण्याचा प्रयत्न करताना त्यांचे भाऊ विनय आणि नितीन, तसेच त्यांच्या मदतीला धावून आलेल्या शेजारीण संध्या धवल देखील भाजल्या गेल्या.
अपघाताची माहिती मिळताच, कामठी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आणि ती शेजारच्या घरांमध्ये पसरण्यापासून रोखली. मात्र, तोपर्यंत अतुल यांचे घर पूर्णपणे जळून खाक झाले होते. घरातील सोन्याचे दागिने, टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर, फर्निचर आणि कपड्यांसह सर्व काही जळून खाक झाले. प्राथमिक अंदाजानुसार, या आगीत कुटुंबाचे ५ लाख रुपयांपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे आणि सहायक पोलीस निरीक्षक मुनीर हिवरकर यांनी घटनास्थळी पंचनामा केला. पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अतुल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी राज्य सरकारकडे पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे, कारण कुटुंबाचा मुख्य आधार असलेल्या व्यक्तीचे निधन झाले असून संपूर्ण कुटुंब बेघर झाले आहे.








