लोकवाहिनी न्यूज,नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने नागपूरजवळील धापावाडा येथे ‘धापावाडा टेक्स्टाईल प्रकल्पांतर्गत’ सिल्क साडी निर्मिती उद्योग सुरू करण्यात आला आहे. या साडीला खूप मागणी असल्याचे गडकरी नेहमी जाहीरपणे आपल्या भाषणातून सांगतात. रविवारी अभिनेत्री व खासदार हेमा मालिनी यांना गडकरी यांनी सिल्क साडीच्या निर्मिती प्रक्रियेपासून तर बाजारात येईपर्यंतची प्रक्रिया सांगितली.
सुप्रसिद्ध अभिनेत्री तसेच खासदार हेमा मालिनी यांनी रविवारी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी नितीन गडकरी व कांचन गडकरी यांनी धापावाडा येथील होतकरू महिलांनी हातमागावर विणलेली ‘करवत काठी साडी’ हेमा मालिनी यांना भेट दिली. यावेळी गडकरी यांनी धापावाडा येथील सुती साडीला ‘जॅकॉर्ड’ची बॉर्डर करण्याचे काम सुरू असल्याचे व या प्रकल्पातून नागपूरसह विदर्भाला सुती हातमाग व पॉवरलूम साडीची ओळख देण्याचा प्रयत्न असल्याचे हेमा मालिनी यांना सांगितले.
विशेष म्हणजे मागील वर्षी वर्ध्यामध्ये ‘ॲग्रोव्हिजन’च्या एका कार्यक्रमात गडकरींनी हेमा मालिनी यांना हा टेक्स्टाईल प्रकल्प पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. नागपूरसह विदर्भ एकेकाळी हातमाग व पॉवरलूमच्या साड्यांसाठी प्रसिद्ध होता. ही ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी धापावाडा येथे ‘धापावाडा टेक्स्टाईल’ नावाने प्युअर सिल्कच्या कारखान्यावर काम सुरू आहे. येथे प्राथमिक स्वरूपात तयार होणाऱ्या साड्यांवर झारखंड येथे नक्षीकाम केले गेले. त्यामुळे ही साडी इतकी सुंदर झाली की तिला सर्वत्र मागणी वाढली असल्याचे त्यावेळी गडकरी म्हणाले होते.
दरम्यान, धापावाडा येथील टेक्स्टाईल्सची वास्तू सुमारे सहा महिन्यांत पूर्ण होईल व येथे कार्यक्रमासाठी हेमा मालिनी यांना आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. “हेमा मालिनी यांना मी धापावाड्याला तयार होणाऱ्या साडीतच येण्याची विनंती करणार आहे,” असेही नितीन गडकरी म्हणाले होते. हेमा मालिनी या साडीत आल्यास स्वाभाविकपणे या साडीचे मार्केटिंग होईल, असेही त्यांनी सांगितले होते. आज गडकरी यांनी यावरच हेमा मालिनी यांच्यासोबत चर्चा केल्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रकल्पात सुती साडीला जॅकॉर्डची बॉर्डर करण्याचे काम सुरू आहे. ते झाल्यास ही साडी केवळ ४०० रुपयांत उपलब्ध होईल. या साडीची किंमत बाहेर दोन ते तीन हजार रुपये आहे, परंतु ही साडी गरीब व मध्यमवर्गीय महिलांना केवळ ४०० रुपयांत उपलब्ध करून दिली जाईल. त्यातही विक्रीचे काम करणाऱ्या महिलेला ६० रुपये प्रति साडी मजुरी आणि १० रुपये ट्रस्टच्या खात्यात जातील. या प्रकल्पामुळे पुन्हा नागपूरसह विदर्भाला सुती हातमाग व पॉवरलूम साडीची ओळख देण्याचा प्रयत्न असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले.








